Canada Hindu Temple Attack : कॅनडात मंदिरावर झालेल्या आक्रमणानंतर संतप्त हिंदूंनी घडवले हिंदूऐक्याचे दर्शन !

मंदिराबाहेर एकत्र आलेले हिंदू

ब्रॅम्प्टन (कॅनडा) – येथील हिंदु सभा मंदिरावरील खलिस्तानींनी केलेल्या आक्रमणानंतर हिंदूंनी मोठ्या संख्येने एकत्र येत मंदिराबाहेर शक्ती दाखवून दिली. या वेळी सहभागी हिंदूंच्या हातात तिरंगा होता. ‘वन्दे मातरम्’ आणि ‘जय श्रीराम’ यांच्या घोषणा देत जमावाने हिंदूऐक्याचे दर्शन घडवले. या वेळी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात सहभागी झालेल्या ऋषभ नावाच्या तरुणाने सांगितले की, येथे घडलेल्या प्रकारामुळे एक हिंदु समुदाय म्हणून आम्ही खूप दुःखी आहोत. हिंदु समाजाच्या समर्थनार्थ आम्ही येथे आलो आहोत. हिंदु समुदायाने कॅनडामध्ये खूप योगदान दिले आहे आणि आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही खूप आर्थिक मूल्य जोडतो, आम्ही जिथे जातो, तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करतो. राजकारणी आणि पोलीस यांची वर्तणूक पाहून खूप वाईट वाटते. आम्ही फक्त न्याय मागत आहोत. कायद्याचे राज्य पाळले गेले पाहिजे आणि गुन्हेगारांवर कायद्याच्या नियमानुसार कारवाई झाली पाहिजे.

कॅनडाच्या माजी शीख मंत्र्यांनी ट्रुडो यांना म्हटले ‘मूर्ख’ !

माजी पंतप्रधान पॉल मार्टिन यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या उज्ज्वल दोसांझ यांनी एका लेखात दावा केला आहे की, कॅनडातील अनेक गुरुद्वारे खलिस्तान समर्थकांच्या कह्यात आहेत. आज कॅनडातील लोक ‘खलिस्तानी’ आणि ‘शीख’ यांना एक मानतात, जणूकाही आपण शीख आहोत, तर आपण सर्व खलिस्तानी आहोतच. हे ट्रुडो यांच्या चुकांचा परिणाम आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो ‘सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मूर्ख व्यक्ती’ आहेत. बहुतेक शीख धर्मनिरपेक्ष आहेत आणि त्यांना खलिस्तानशी काहीही संबंध ठेवायचा नाही, हे ट्रुडो यांना कधीच समजले नाही !

संपादकीय भूमिका

कॅनडातील हिंदूंकडून भारतीय हिंदूंनी आदर्श घेतला पाहिजे !