दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ! – फडणवीस; भिवंडी येथे खालिफ शेख यांचा अर्ज !…

निवडणूक विशेष !

काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ! – फडणवीस

मुंबई – राज्यात ३ ते ४ ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.


भिवंडी येथे खालिफ शेख यांचा अर्ज !

भिवंडी (जिल्हा ठाणे) – विधानसभा निवडणुकीसाठी भिवंडी येथे खालिफ शेख यांनी उमेदवारीचा अर्ज केला आहे. खालिफ शेख हे ३ वर्षे कारागृहात आहेत. तिथूनच त्यांनी हा अर्ज केला आहे. (ही लोकशाहीची विदारक थट्टा आहे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ? – संपादक)


विकासकामे केल्याने प्रसार करू नका !- ठाणे येथील मतदार

आमदार जितेंद्र आव्हाड

ठाणे – जिल्ह्यात विकासकामे केल्याने वेगळा प्रसार करण्याची आवश्यकता नाही, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या मुसलमान मतदारांनी सुनावले आहे. ते प्रसार करत असतांना मुसलमान मतदार आणि ते यांच्यात बाचाबाची झाली.

तेथील गृहनिर्माण वसाहतींकडून ‘आम्ही तुम्हाला मतदान करू’, असे पत्र त्यांनी घेतल्याचे समजते. गल्लीबोळात फिरणे आमचा अपमान आहे, असेही तेथील मतदारांनी म्हटले आहे.


अभिजित बिचुकले उभे रहाणार !

अभिजित बिचुकले

बारामती – येथून अभिनेते आणि ‘बिग बॉस’ मालिकेत काम केलेले अभिजित बिचुकले हे निवडणुकीला उभे रहाणार आहेत. मला मतदान करून विधानसभेवर पाठवा, असे आवाहन त्यांनी तेथील मतदारांना केले आहे. त्यामुळे बारामतीचे नाव खर्‍या अर्थाने होईल, असेही ते म्हणाले.


अजित पवार यांना ‘मुख्यमंत्री’ नावाची पाटी भेट

कार्यकर्त्यांनी दिलेली मुख्यमंत्री लिहिलेली पाटी हातात घेऊन अजित पवार

बारामती – येथे प्रसार करत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘मुख्यमंत्री’ असे लिहिलेली दारावर लावायची मोठी पाटी भेट दिली. त्या वेळी अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री’ या शब्द अंगावरील शालीने झाकला आणि मगच छायाचित्र काढले. त्या वेळी कार्यकर्त्यांनी शाल काढायचा आग्रह केला आणि ‘इच्छा तर आहे ना दादा’, असे कार्यकर्ते म्हणाले.


सदा सरवणकर लढणार !

सदा सरवणकर

मुंबई – मनसेचे अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरला  आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांना ‘लढू नका, माघार घ्या’ असे सांगितल्याचे समजत होते. राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी पाठिंबा दिल्याने त्याची परतफेड म्हणून युती येथे उमेदवार देणार का ? असा प्रश्न होता.