पुणे येथे १ कोटी रुपयांचा गुटखा पकडला !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – खेड शिवापूर टोल नाका परिसरामध्ये कर्नाटकातून पुण्यात विक्रीस पाठवलेला १ कोटी १५ लाख ८८ सहस्र रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. (गुटखाबंदीची ऐशीतैशी ! – संपादक) ही कारवाई ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केली. या प्रकरणी मल्लमा दौडमनी आणि तुषार घोरपडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार स्वप्नील भालशंकर, बबलू पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अक्षय नलावडे यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहर तसेच परिसरामध्ये छुप्या पद्धतीने गुटखा विक्री होत असते. परराज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा विक्रीस येत असतो. बाह्यवळण मार्गावरून गुटखा वाहतूक करणारा ट्रक येत असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिवरे गावाजवळ सापळा लावून कारवाई करण्यात आली.