सांगली येथे काँग्रेसद्वारे पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी !

भाजपची सूची घोषित !

महाराष्ट्र विधान सभा निवडणूक

जत येथे गोपीचंद पडळकर, तर शिराळा येथे सत्यजित देशमुख

सांगली, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना २६ ऑक्टोबर या दिवशी पक्षाने उमेदवारी घोषित केली आहे. काँग्रेसच्या ‘ए.आय.सी.सी.’च्या बैठकीनंतर रात्री विलंबाने समितीचे सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी उमेदवारांची सूची घोषित करण्यात आली. सांगली विधानसभा मदारसंघातून पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती; मात्र जयश्री पाटील यांची मागणी फेटाळण्यात आली.

दुसरीकडे जत मतदारसंघातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, तर शिराळा विधानसभा मतदारसंघातून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी घोषित झाली आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळ घेऊन भेट घेत उमेदवारीची मागणी केली आणि गोपीचंद पडळकर यांना जत येथून उमेदवारी दिल्यास बंडखोरी अटळ असेल, अशी ठोस भूमिका स्पष्ट केली होती; मात्र स्थानिक भाजपच्या पदाधिकार्‍यांना डावलून भाजपने पडळकर यांनाच अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे जगताप समर्थक अप्रसन्न झाले आहेत.