सरकारला गोव्यात सापडल्या ६० कायदेशीर वारसदार नसलेल्या भूमी

कायदेशीर वारसदार नसलेल्या भूमी सरकार घेणार कह्यात

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – सरकारला राज्यात कायदेशीर वारसदार नसलेल्या ६० भूमी सापडल्या आहेत. सरकार आता अशा भूमी कह्यात घेण्यासाठी कायदा करणार आहे. सरकारने यापूर्वी कायदेशीर वारसदार नसलेल्या व्यक्तीच्या निधनानंतर तिची भूमी आणि कायदेशीर वारसदार नसलेली भूमी कह्यात घेण्यासाठी अधिसूचना काढली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘भूमी बळकावल्याच्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष अन्वेषण पथकाला कायदेशीर वारसदार नसलेल्या भूमी सापडल्या आहेत. राज्यात अशा एकूण ६० भूमी सरकारच्या लक्षात आल्या आहेत. पुढील काळात अशा आणखीन भूमी सापडण्याचीही शक्यता आहे. सरकारने नियुक्त केलेल्या एक सदस्यीय आयोगाच्या सूचनेवरून सरकारने या भूमी कह्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने हल्लीच या सदंर्भातील कायदा अधिसूचित केला आहे. यानुसार कायदेशीर वारसदार नसलेल्या भूमी सरकार कह्यात घेणार आहे. तत्पूर्वी प्रशासन भूमीसंबंधी कायदेशीर वारसदार नसल्यास त्याविषयी सरकारी ‘गॅझेट’मध्ये सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करणार आहे. ही नोटीस राज्यातील पंचायती, पालिका आदी ठिकाणी लावली जाणार आहे. नोटीस प्रसिद्ध झाल्यावर संबंधितांना भूमीवर हक्क सांगण्यासाठी १ वर्षाचा कालावधी उपलब्ध असेल.’’