गोरक्षक राजीव झा यांनी गोमांसाची आंतरराज्य तस्करी केली उघड
फोंडा, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – गोरक्षक राजीव झा यांनी गोमांसाची आंतरराज्य तस्करी उघड केली आहे. या प्रकरणी कुळे पोलिसांनी मोले तपासनाक्यावर ४०० किलो गोमांस कह्यात घेतले आहे. एका ‘ईको’ चारचाकी वाहनातून हे गोमांस गोव्यात आणले जात होते. त्याचप्रमाणे केरी, सत्तरी तपासनाक्यावर ८० किलो गोमांस कह्यात घेण्यात आले आहे.
पशूसंवर्धन खात्यातील अधिकार्यांनुसार हे मांस खाण्यायोग्य स्थितीत नव्हते आणि त्याला दुर्गंध येत होता. कदाचित् २ दिवस आधीच गोवंशियांची हत्या करून ते मांस गोव्यात आणले जात होते आणि अशी वाहतूक करणे अनधिकृत आहे, असे संबंधित अधिकार्यांचे म्हणणे आहे. गाडीत उघड्यावरच हे मांस ठेवण्यात आले होते आणि ते खाण्यास अपायकारक होते. कुळे पोलिसांनी वाहतुकीसाठी वापरलेले वाहन कह्यात घेतले आहे, तसेच संशयित लियाकत बेपारी आणि त्याचा मुलगा वहीब बेपारी या २ संशयितांना कह्यात घेतले आहे.
केरी, सत्तरी तपासनाक्यावर ८० किलो गोमांस कह्यात
वाळपई – केरी, सत्तरी तपासनाक्यावर पोलिसांनी बेळगाव येथून गोव्यात अवैधपणे आणण्यात येणारे ८० किलो गोमांस कह्यात घेतले आहे. हे मांस उघड्यावर होते आणि याचा बाजारभाव ५६ सहस्र रुपये आहे. पोलिसांनी गोवा प्राणी संरक्षण कायदा १९९५ अंतर्गत संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
नागवा, हडफडे येथे ५७ किलो मांस कह्यात
नागवा, हडफडे येथे बेकायदा मांसविक्री दुकानावर पशूवैद्यकीय अधिकार्यांनी धाड टाकून विक्रीस ठेवलेले ५७ किलो मांस कह्यात घेतले असून ३ जणांवर हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिकागोरक्षकांना जमते ते पोलिसांना का जमत नाही ? |