‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत बँक कर्मचार्यांवरील आक्रमणांचे प्रकरण
१६ नोव्हेंबर या दिवशी बँकांचा संप
मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ राबवतांना बँक कर्मचार्यांवर आक्रमणे होत असल्याने बँक कर्मचार्यांच्या मध्यवर्ती संघटनेने आंदोलनाची चेतावणी दिली आहे. ऑक्टोबरपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर आंदोलन करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे ऐन निवडणूक काळात बँकांचा संप होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
२१ ते २५ ऑक्टोबर या काळात निषेध बिल्ले लावून काम केले जाईल. २५ ऑक्टोबर या दिवशी आझाद मैदानात आंदोलन, तर १४ नोव्हेंबर या दिवशी प्रमुख शहरांमध्ये कर्मचार्यांकडून मेणबत्ती पदयात्रा काढण्यात येईल. १५ नोव्हेंबर या दिवशी सर्व प्रमुख शहरांत आंदोलने आणि १६ नोव्हेंबर या दिवशी संप करण्यात येणार असल्याचे ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’चे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले.