१५० कोटी लोकसंख्येच्या भारतात १० कोटी घुसखोर ! – डॉ. सुरेश चव्हाणके, सुदर्शन वाहिनीचे संपादक

हिंदु स्वाभिमान मेळावा शिव प्रेरणा यात्रा !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालतांना श्री. सुरेश चव्हाणके (उजवीकडे) आणि श्री. संतोष देसाई

तासगाव (जिल्हा सांगली), २१ ऑक्टोबर (वार्ता.) – १५० कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात १० कोटी घुसखोर असून यापैकी आसाममधून ३ लाख घुसखोर महाराष्ट्रात आले आहेत, मग आपला महाराष्ट्र सुरक्षित आहे का ? हे घुसखोर देशातील प्रत्येक भागात घुसलेले आहेत. देश सुरक्षित नसेल, तर आपण सुरक्षित राहू का ? घराभोवती वाढलेले कुंपण आपल्या मनातील भीती तथा असुरक्षिततेची भावना दर्शवते. या सर्व पार्श्वभूमीवर ‘एन्.आर्.सी.’चा कायदा यायलाच हवा. बांगलादेशातील हिंदूंवर झालेले अत्याचार भारतात होणार नाहीत, या भ्रमात रहात असाल, तर तुम्ही फसाल, असे प्रतिपादन प्रखर हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रभक्त तथा ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी येथे केले.

१८ पगड जातींत विखुरलेल्या हिंदूंना एक हिंदु म्हणून एकत्रित करण्यासाठी ‘हिंदु स्वाभिमान’ मेळावा अर्थात् ‘शिवप्रेरणा यात्रा’ प्रखर हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रभक्त तथा राष्ट्रीय सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेशजी चव्हाणके यांनी चालू केली आहे. त्यानिमित्त २१ ऑक्टोबर या दिवशी त्यांचे तासगाव येथे भव्य स्वागत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

श्री. सुरेश चव्हाणके पुढे म्हणाले की, लोकसंख्या विचारात घेता महाराष्ट्र २१ व्या क्रमांकावर आहे. म्हणजे २० राज्ये आपल्या पुढे आहेत. आपली भूमी, जागा सोडू नका, सोडली, तर ती पुन्हा मिळणार नाही. राष्ट्रकारणाने यांचा खेळ संपेल राजकारणाने नाही. वक्फ मंडळाला १० कोटी मान्य झाल्यावर जाब विचारणारा मी होतो. ते प्रकरण २ कोटी रुपयांवरच थांबले. पुढे ८ कोटी रुपये दिलेले नाहीत. ‘व्होट जिहाद’ होत आहे. घुसखोरीच्या याचिकेवर निर्णय झाला असून २५ मार्च १९७१ नंतरचा प्रत्येक अहिंदू हा घुसखोरच असल्याचे सर्वाेच्च न्यायालयाने सांगितले आहे.

हिंदु जनजागृती समितीकडून सुरेश चव्हाणके यांना ग्रंथ भेट !

हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ डॉ. सुरेश चव्हाणके (उजवीकडे) यांना भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई.

येथील मुख्य चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर सानेगुरुजी वाचनालय येथे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि भारतमातेच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सांगली जिल्हा समन्वयक श्री. संतोष देसाई यांनी त्यांना ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ हा ग्रंथ भेट म्हणून दिला.

मी मेलो, तरी पुन्हा जन्म घेऊन हिंदुत्वासाठीच कार्य करत राहीन ! – डॉ. सुरेश चव्हाणके

या वेळी ‘बॉयकॉट हलाल जिहाद’ (हलाल जिहादचा बहिष्कार करा !) याचा क्यू.आर्. कोड स्वाक्षरी मोहिमेसाठी सभागृहाबाहेर लावण्यात आला होता. याविषयी समितीचे श्री. संतोष देसाई यांनी आवाहन केल्यानंतर अनेक उपस्थित हिंदूंनी स्वाक्षरी केली. ‘एक दिवस मरायचे आहे. हिंदु धर्मात पुनर्जन्म आहे आणि या सभागृहात आलेला प्रत्येक हिंदु हा पुनर्जन्म घेऊनच आला आहे. यात मेलो, तर पुन्हा जन्म घेऊन हिंदुत्वासाठीच कार्य करत राहीन’, असे चव्हाणके यांनी स्पष्ट केले.