थोडक्यात महत्त्वाचे : ६ जिल्हा रुग्णालयांत कर्करोगावर उपचार !… सलमानला मारण्यासाठी सुरक्षारक्षकाशी मैत्री केली ! – आरोपी सुक्खा…

६ जिल्हा रुग्णालयांत कर्करोगावर उपचार !

मुंबई – कर्करोग झालेल्या रुग्णांना अधिकाधिक चांगले आणि त्यांच्याच परिसरात उपचार मिळावेत, यासाठी राज्यातील ६ जिल्हा रुग्णालयांमध्ये याविषयीची उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ४ जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘रेडिएशन ऑनकॉलॉजी’ केंद्र, तर

२ जिल्ह्यांमध्ये रेडिओथेरेपी आणि ‘डे केअर किमोथेरेपी केंद्र’ चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र जालना, रत्नागिरी, बारामती आणि धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये चालू होईल, तर अमरावती अन् नाशिक येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र उभारण्यात येणार आहे.


सलमानला मारण्यासाठी सुरक्षारक्षकाशी मैत्री केली ! – आरोपी सुक्खा

मुंबई – बिष्णोई टोळीचा मारेकरी सुक्खा याने अटकेनंतर पोलिसाना सांगितले, ‘‘अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट बिष्णोई टोळीने आखला होता.’’ त्यासाठी मारेकर्‍याने सलमान खानच्या सुरक्षारक्षकाशी मैत्री केली होती; पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला.


बँकेद्वारे ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी अटकेत !

पनवेल – न्हावाशेवा परिसरातील एका व्यक्तीची साडेदहा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. याचे अन्वेषण करतांना पोलिसांनी एका टोळीचा छडा लावला. यातील तरुणांना पोलिसांनी अटक केली. ही टोळी वसई-विरार परिसरातील एका गाळ्यात सक्रिय होती. बनावट कागदपत्रांद्वारे बँक खाती उघडून ऑनलाईन फसवणुकीची रक्कम काढण्यासाठी ही टोळी काम करत होती.

संपादकीय भूमिका : अशांकडून आर्थिक फसवणुकीची सर्व रक्कम वसूल करून घ्यायला हवी !


अपहरणकर्त्या महिलेवर गुन्हा नोंद !

वसई – येथून अपहरण झालेल्या ३ वर्षांच्या मुलाची पोलिसांनी ४ घंट्यांत सुटका केली. प्रेमसंबंधात मुलाच्या पालकांचा अडथळा येत असल्याने त्यांना धडा शिकवण्यासाठी साबरिन शेख (वय २२ वर्षे) हिने अपहरण केले होते. ही तरुणी ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत काम करते. तिने शाळेतून मुलाचे अपहरण केले होते. तिचा प्रियकर मुलाचा काका होता. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.

संपादकीय भूमिका : अशांना कठोर  शिक्षाच करायला हवी !