श्रीक्षेत्र जेजुरी येथील ‘श्री खंडोबा डोंगरा’वर मद्यपींचा धिंगाणा !

८ स्थानिकांसह १२ जण घायाळ


जेजुरी (पुणे) –
सोमवती यात्रेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातून ‘श्री खंडोबा डोंगरा’वरील खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये आपापसांतील वादातून मारहाण चालू झाली. ही भांडणे सोडण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांनाही त्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे भाविकांमध्ये अप्रसन्नता निर्माण झाली. या मारहाणीत स्थानिक नागरिक हनुमंत शंकर गोडसे, प्रवीण हनुमंत गोडसे, राहुल पांडुरंग गोडसे, धनंजय प्रकाश गोडसे, हरिभाऊ शंकर गोडसे, शीतल धनंजय गोडसे, संजय ज्ञानेश्वर तांबे हे घायाळ झाले. कल्याणहून आलेल्या भाविकांतील नीलेश शांताराम भिसे, राहुल द्वारकानाथ भोईर, भूषण किसन रोने आणि किसन वामन रोने हे घायाळ झाले.

१. ठाणे जिल्ह्यातून ३० ते ३५ भाविक यात्रेनिमित्त जेजुरी गडाच्या पायथ्याशी ‘गोडसे हॉल’मध्ये उतरले होते. त्यातील काही जणांनी मद्यप्राशन केलेले होते. त्यातून त्यांच्यात भांडण चालू झाले. (हिंदूंच्या तीर्थक्षेत्री भाविकांकडून मद्यप्राशन करणे, हे धर्मशिक्षणाच्या अभावाचेच लक्षण आहे. हिंदूंच्या तीर्थक्षेत्राचा परिसरच नव्हे, तर तो पूर्ण तालुका कायमस्वरूपी मद्य आणि मांस बंदी करणे आवश्यक आहे ! – संपादक)

२. हे भांडण वाढू लागल्याने सभागृहमालक राहुल गोडसे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मद्यपींनी त्यांनाच दगड आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण केली.

३. मारहाण केल्यानंतर मद्यपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्थानिक नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी दगडफेक केली. त्यातही नागरिक घायाळ झाले.

४. जेजुरी पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी मद्याच्या बाटल्यांची खोकी, रिकाम्या मद्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या.

भाविकांकडून स्थानिकांना मारहाणीचे प्रकार

गेल्या महिनाभरात जेजुरीमध्ये भाविकांकडून स्थानिकांना मारहाण करण्याचे २ ते ३ प्रकार घडले. देवदर्शनासाठी येणारे मद्यपी भाविक पावित्र्य न राखता ‘डीजे’ (मोठा आवाज करणारी ध्वनीक्षेपक यंत्रणा) आणि वाद्याच्या तालावर धिंगाणा घालतात. त्यातून सामाजिक ऐक्य आणि शांतता बिघडत आहे. अशा भाविकांवर जेजुरी पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा गाव बंद ठेवून उपोषण करण्याची चेतावणी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली.