‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !

शेतकर्‍यांना धास्ती, पाणीटंचाई ओढवणार नसल्याचा जलस्रोत खात्याचा दावा

(जेव्हा मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे पाणी सामान्यापेक्षा अधिक गरम होते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल् निनो’, असे म्हणतात.)

पणजी, १५ जून (वार्ता.) – ‘एल् निनो’चा प्रभाव आता प्रत्यक्ष जाणवू लागला आहे. हवामान खात्याने ‘पुढील काही दिवस वातावरण कोरडे (पर्जन्यविरहित) असेल’, असा अंदाज वर्तवला आहे. राज्यात आतापर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा अनुमाने ५० टक्के अल्प आहे. पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत खरीप पेरणीही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाणीटंचाई ओढवणार नसल्याचा जलस्रोत खात्याचा दावा जलस्रोत खात्याने केला आहे.

गोव्यात १ महिन्यासाठी पाण्याचा मुबलक साठा ! – सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री

पावसाच्या दुर्भिक्षाच्या पार्श्वभूमीवर जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर १५ जून या दिवशी म्हणाले, ‘‘गोव्यात पुढील महिन्यापर्यंत पाण्याचा मुबलक पुरवठा आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने प्रशासन आपत्कालीन उपाययोजना आखत आहेत. सद्यःस्थितीत पिसुर्ले खाण खंदकांमधील पाणी पडोसे जलप्रक्रिया प्रकल्पात सोडले जाणार आहे. पुढील १५ दिवसांत पावसाची स्थिती न सुधारल्यास तिलारी कालव्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे.

गोव्यातील धरणांतील पाण्याचा साठा (१४ जूनपर्यंत)

साळावली – ३०.९ मीटर (२८ टक्के)

अंजुणे – ७१ मीटर (११ टक्के)

आमठाणे – ४५.९ मीटर (५२ टक्के)

चापोली – ३०.८ मीटर (४१ टक्के)

गावणे – ५६.८ मीटर (४४ टक्के)

पंचवाडी – १८.९ मीटर (२० टक्के)

तिलारी – ८७.७ मीटर (३१ टक्के)

गोव्यात १ ते १४ जून या कालावधीत सरासरी ३२६ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते; मात्र आतापर्यंत केवळ १६२.३ मि.मी. (६.३८ इंच) पावसाची नोंद झालेली आहे. हे प्रमाण सरासरीच्या तुलनेत ५० टक्के अल्प आहे. १ जूननंतर एकही दिवस १ इंचाहून अधिक पावसाची नोंद झालेली नाही. १० जून या दिवशी सर्वाधिक २४.७ मि.मी. पाऊस पडला आणि तो १ इंचापेक्षाही अल्प आहे. पावसाच्या अभावी दिवसा तापमान वाढून उकाडाही वाढत आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आतापर्यंत काणकोण येथे सर्वाधिक ३९२.२ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. त्यानंतर मुरगाव येथे २२५.४ मि.मी., जुने गोवे येथे १७७ मि.मी., पेडणे येथे १६९.८ मि.मी. आणि धारबांदोडा येथे १५२ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. वास्तविक पाऊस नेहमीप्रमाणे मुबलक प्रमाणात पडल्यास जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये साळावली धरणाचे पाणी पूर्ण क्षमतेने भरत असते; मात्र यंदा गोव्यात वर्ष २०२३ प्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे. वर्ष २०२३ मध्ये पाऊस जूनच्या मध्यंतरी प्रारंभ झाला होता. अंजुणे धरणातील पाण्याची पातळी ११ टक्के पोचल्याने सत्तरी येथील नागरिक नळातून येणार्‍या पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी करत आहेत. वास्तविक राज्यात सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; मात्र अंजुणे धरणात पाणी अल्प झाले आहे. काणकोण तालुक्यातील चापोली आणि गावणे या धरणांमध्ये मात्र मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे.