उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली

हडफडे (गोवा) येथील नाईट क्लबमधील आग दुर्घटना

पणजी, १५ जून (वार्ता.) – हडफडे येथे ६ डिसेंबर २०२५ या दिवशी ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबला आग लागून आतील २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) झालेली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी १५ जून या दिवशी सुनावणीच्या वेळी या प्रकरणातील ‘ॲमिकस क्युरी’ (न्यायालयात सुनावणीला आलेल्या विषयातील तज्ञ व्यक्ती. ही व्यक्ती संबंधित प्रकरणाच्या न्यायदानासाठी साहाय्य करते.) अधिवक्ता रोहित ब्रास डिसा यांना दुर्घटनेतील पीडितांना हानीभरपाई देण्यासाठी दुर्घटनेत मृत पावलेल्या क्लबमधील कर्मचार्‍यांची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये मृत पावलेल्यांचे वय, आश्रित कुटुंबीय, मृत व्यक्तीचे कामावरील पद आणि कामाचे स्वरूप यांविषयी माहितीचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाला मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे न्यायालयात प्रतिनिधित्व करण्यासाठी अधिवक्ता नेमण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी १५ जुलै या दिवशी होणार आहे.