‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !

अमरावती – देशातील ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर आता पुन्हा २१ जून या दिवशी ‘नीट’ची परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईहून हेलिकॉप्टरद्वारे अमरावती शहरात नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणण्यात आल्या. या वेळी १५ वाहनांचा ताफा अन् कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इतक्या मोठ्या सुरक्षा व्यवस्थेतून या प्रश्नपत्रिका अमरावती जिल्हा कोषागर भवनात पोचवण्यात आल्या. विमानतळापासून ते कोषागर भवनापर्यंतचा संपूर्ण मार्ग कडेकोट सुरक्षेखाली ठेवण्यात आला होता. केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाचे सैनिकही तेथे तैनात होते.

संपादकीय भूमिका

  • एका परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी इतकी मोठी यंत्रणा उभी करावी लागणे आधीच्या सुरक्षेतील त्रुटींचे द्योतकच आहे. यामुळे सरकारी यंत्रणेवरही अतिरिक्त आर्थिक आणि प्रशासकीय भार पडला !
  • परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी संबंधित आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करून या प्रकरणाचेही न्यायदान व्हावे, असेच विद्यार्थ्यांना वाटते !