उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली 

लहान मुलांसह उपस्थित कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर

कोल्हापूर – उन्हाळी सुट्टीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा १५ जून या दिवशी नव्या उत्साहात चालू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे औक्षण, पुष्पवृष्टी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सवामुळे शाळा परिसर आनंद, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलून गेला. गावस्तरीय शाळा व्यवस्थापन समित्या, लोकप्रतिनिधी, पालक, शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी भुदरगड तालुक्यातील नाधवडे विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रवेशोत्सवात सहभाग घेतला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुदृढ आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी करवीर तालुक्यातील वरणगे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्यांनी नियमित शिक्षण, वाचनाची आवड आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. या वेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात आले.