थोडक्यात महत्त्वाचे (१६.०६.२०२६)

शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर !

महाड – येथे रायगडावर २७ जून या दिवशी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.  सोहळ्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून शिवभक्तांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले आहेत. येथील आढावा बैठकीत ते बोलत होते.


नालेसफाईतील त्रुटी ‘एआय’मुळे उघड !

मुंबई – नालेसफाईच्या कामातील त्रुटी ‘एआय’ने (कृत्रिम बुद्धीमत्तेने) उघडकीस आणल्या. या प्रकरणी कंत्राटदारांना ९ कोटी २५ लाख ७२ सहस्र ८३० रुपयांचा दंड महापालिकेने ठोठावला आहे. ही दंडात्मक रक्कम कंत्राटदारांच्या देयकांतून वसूल करण्यात येईल. गाळ काढण्याच्या कामांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून ‘एआय’ प्रणाली त्यातील त्रुटी शोधते.


मुंबईत दुर्गंधीयुक्त पाणी !

    मुंबई – येथील मालाड परिसरात काळपट आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. या प्रकरणी पाईपलाईनच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे. (स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मुंबईसारख्या ठिकाणी अशी स्थिती होणे लाजिरवाणे ! – संपादक)


अभिनेत्रीची आत्महत्या

मुंबई – दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध मािलका ‘कुमकुम भाग्य’ यातील अभिनेत्री संचिता उगले (वय ३० वर्षे) हिने गळफास घेत आत्महत्या केली. ती नालासोपारा येथे रहात होती. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.


परिचारिकेची हत्या; आरोपीस अटक !

संपादकीय भूमिका : समाजातील संयम नष्ट झाल्याचे दर्शवणारी घटना !

यवतमाळ – येथील दत्त चौक परिसरातील ‘श्रोत्री हॉस्पिटल’मधील २ निवासी सहकर्मचारी परिचारिकांमध्ये किरकोळ वाद झाला. यातून एका परिचारिकेचा मुलगा हिमांशू भगत (वय २३ वर्षे) याने दुसर्‍या परिचारिका कुसुम चांदेकर (वय ४५ वर्षे) हिची धारदार शस्त्राने गळा चिरून रुग्णालयाच्या आवारातच भरदिवसा हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.