श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथे लाखो रुपयांचा गुटखा जप्त

मुद्देमालाच्या गोण्यांवर पोलीस खात्याचा सांकेतिक क्रमांक आढळला

श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर) – स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्ता परिसरातील एका ठिकाणावर धाड घालून वेगवेगळ्या आस्थापनांचा लाखो रुपयांचा सुगंधी गुटखा जप्त केला. ज्या गोण्यांमध्ये गुटखा साठवून ठेवण्यात आला होता, त्यावर पोलीस खात्याशी निगडित ‘सी.आर्. ४६३/२६’ हा सांकेतिक क्रमांक आढळला आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईतील हा गुटखा असेल, तर तो पुन्हा गुटखा विक्रेत्याकडे गेला कसा ? हा मुद्देमाल त्या विक्रेत्याकडे कुणी दिला ? यामध्ये नेमके कोण कोण सहभागी आहेत ? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे कुणी दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल.

 

संपादकीय भूमिका

आधीच्या कारवाईत जप्त केलेला आणि शासकीय गोदामात किंवा पोलीस ठाण्यात जमा असलेला मुद्देमाल पुन्हा गुटखा माफियांच्या हातात पडतो, यावरून पोलीसदलातील काही घटकांचे या गुन्हेगारांशी असलेले साटेलोटे उघड होते. अशा भ्रष्टाचारी पोलिसांकडून गुटखाबंदी कायद्याची कार्यवाही होईल का ?