देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली – वर्ष २०१४ पूर्वी देशात अल्पसंख्यांकांच्या मतपेढीवर आधारित राजकारणाला प्राधान्य दिले जात होते. सरकारी योजना आखतांना बहुसंख्य हिंदु समाजाचा विचार दुय्यम ठरत होता; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वर्ष २०१४ नंतर देशातील राजकीय आणि सामाजिक चित्र पूर्णपणे पालटले. हिंदु समाजाच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून देशात हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात हिंदु धर्म आणि संस्कृती यांना जागतिक स्तरावर सन्मानाचे स्थान मिळाले आहे. परदेशी राष्ट्रप्रमुखांना ‘भगवद्गीता’ भेट देण्याची परंपरा चालू झाली आहे, असे वक्तव्य पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कणकवली शहरातील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.

मंत्री राणे पुढे म्हणाले की …

१. अयोध्येतील भव्य राममंदिर उभारणीचा अनेक वर्षे न्यायालयात प्रलंबित असलेला प्रश्न शांततामय आणि दंगलमुक्त वातावरणात मार्गी लागला, तसेच उज्जैन येथील महाकालेश्वर कॉरिडॉरसह (कॉरिडॉर म्हणजे २ भागांना जोडणारा मार्ग) देशातील विविध धर्मस्थळांचा विकास करून सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यात आली आहे.

२. काँग्रेस सरकारच्या काळात वक्फ कायद्यातील त्रुटींमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली या कायद्यात आवश्यक सुधारणा करून हिंदु समाजाच्या भूमींचे संरक्षण करण्याचे काम करण्यात येत आहे.

३. ‘लव्ह जिहाद’सारख्या संवेदनशील विषयांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून देश समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

४. वर्ष २०१४ पूर्वी पाकिस्तान किंवा इतर आतंकवादी संघटनांच्या कारवायांना प्रभावी उत्तर दिले जात नव्हते; मात्र आज भारताकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे कुणाचेही धाडस होत नाही. तिहेरी तलाकविरोधी कायदा लागू करून मुसलमान महिलांना न्याय देण्याचे कामही केंद्र सरकारने केले आहे.

५. देशातील तरुणवर्ग देशविघातक शक्तींच्या विरोधात ठामपणे उभा आहे. त्यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ असेल किंवा अन्य काही आंदोलने उभी राहिली, तरी पंतप्रधानांच्या नेतृत्वाला देशातील युवा पिढीचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. सर्वाधिक काळ देशसेवा करण्याचा मान मिळवून नवा इतिहास रचल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत आहे.