‘एके दिवशी माझ्या मनाला मरगळ आली असतांना मला अकस्मात् पू. (श्रीमती) दातेआजी (सनातन संस्थेच्या ४८ व्या (व्यष्टी) संत, वय ९१ वर्षे) यांचे दर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली. ध्यानीमनी नसतांना गुरुदेवांनी ही संधी दिल्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘प.पू. गुरुदेव आपल्या साधकांना साधनेत टिकवून ठेवण्यासाठी किती प्रयत्न करतात आणि गुरुदेवांनाच साधकांच्या साधनेची अधिक चिंता आहे’, असे मला वाटले. पू. दातेआजींचे दर्शन घेण्याची अकस्मात् मिळालेली संधी माझ्यासाठी पुष्कळच प्रेरणादायी ठरली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. पू. दातेआजींच्या खोलीत जाण्यापूर्वी
पू. दातेआजींना भेटायला जाण्याआधी मला थोडा वेळ खोलीबाहेर थांबण्यास सांगितले होते. तेव्हा ‘माझे मन निर्विचार होऊन श्वासावर लक्ष केंद्रित होत आहे’, असे मला जाणवले.
२. पू. आजींच्या खोलीत जातांना
पू. आजींच्या खोलीपर्यंत जाण्याच्या मार्गिकेमध्ये ‘एक निर्वात पोकळी सिद्ध झाली असून मी कुठल्यातरी दुसर्याच लोकात जात आहे’, अशी मला जाणीव होत होती. पू. आजींच्या खोलीचे दार उघडल्यावर ही जाणीव अधिक प्रकर्षाने झाली.
३. पू. आजींच्या खोलीत प्रसन्न आणि शांत वाटणे
पू. आजी बर्याच काळापासून झोपूनच आहेत, तरीही त्यांच्या खोलीत गेल्यावर ‘मी रुग्णाईत व्यक्तीच्या खोलीत आले आहे’, असे मला वाटले नाही. तेथे पुष्कळ प्रसन्नता, स्थिरता आणि शांती जाणवत होती.
४. ‘पू. आजींनी स्वतःचा देह ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि संशोधन’ यांसाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण केला आहे’, हे ऐकल्यावर दधीचि ऋषींचे स्मरण होऊन कृतज्ञता वाटणे
पू. आजींच्या सूनबाईंनी आम्हाला पुष्कळ चांगल्या पद्धतीने सर्व माहिती सांगितली. तेव्हा ‘गुरुदेव आमच्याकडून साधना करून घेण्यासाठी कोणत्या स्तरावरील प्रयत्न करत आहेत’, याची जाणीव होऊन माझे मन कृतज्ञताभावाने भरून आले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या वेळी मला आनंद आणि कृतज्ञता वाटत होती. दातेकाकूंनी सांगितल्याप्रमाणे ‘पू. आजींनी स्वतःचा देह आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि संशोधन यांसाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला आहे’, हे ऐकल्यावर मला दधीचि ऋषींची आठवण झाली. ‘पू. आजींनी देहत्याग न करता आणि देहात न अडकता तटस्थपणे आपला देह संशोधनासाठी दिला आहे. यातून प.पू. गुरुदेव पू. आजींची पुष्कळ उच्च कोटीची साधना करून घेत आहेत. पू. आजींमुळे आम्हा साधकांना नवीन सूत्रे शिकायला मिळत आहेत. त्याबद्दल श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव आणि पू. दातेआजी यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे’, असे मला वाटले.
हे श्रीकृष्णा, माझे किती जन्मांचे पुण्य असेल, त्यामुळे मी सनातन संस्थेशी जोडले गेले आणि प.पू. गुरुदेवांसारखे गुरु मला लाभले. त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. आर्या अमेय लोटलीकर, फोंडा, गोवा. (२६.९.२०२४)
पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी आणि त्या वास्तव्याला असलेली खोली यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे‘जुलै २०२४ मध्ये आम्हा काही साधकांना पू. (श्रीमती) दातेआजी यांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत. १. पू. दातेआजी रहात असलेल्या खोलीसंदर्भात जाणवलेली सूत्रेअ. मला पू. दातेआजी यांची खोली मूळ आकारापेक्षा मोठी झाल्याचे जाणवले. खोलीत बरेच साधक उभे असूनही आणखी जागा शिल्लक होती. आ. खोलीतील वातानुकूलन यंत्र चालू असूनही मला त्या खोलीत एक वेगळ्याच प्रकारचा थंडावा जाणवला. तो थंडावा हवाहवासा वाटत होता. इ. खोलीत मला गोडसर सुगंध सतत येत होता. २. पू. दातेआजी यांच्यासंदर्भात जाणवलेली सूत्रेअ. ‘पू. दातेआजी कधीही उठून बसतील आणि बोलू लागतील’, असे मला वाटत होते. आ. पू. आजी एकाच स्थितीत झोपून असूनही ‘त्या रुग्णाईत आहेत’, असे वाटत नव्हते. नेहमीपेक्षा त्यांचा चेहरा अधिक आनंदी दिसत होता. इ. ‘पू. आजी प.पू. डॉक्टरांच्या अखंड अनुसंधानात आहेत’, असे वाटले.’ – सुश्री (कु.) राजश्री सखदेव (वय ५९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जुलै २०२४) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |