भाजपने मतदारसूचीतून सहस्रावधी नावे वगळली ! – मविआ

मुंबई – भाजपचे मतदारसूचीतून सहस्रावधी नावे वगळली आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग आहे. याविषयी आम्ही निवडणूक आयोगाला कल्पना देणार आहोत, अशी माहिती महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. १८ ऑक्टोबर या दिवशी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी हा गंभीर आरोप केला.

या वेळी नाना पटोले म्हणाले, ‘‘राज्याच्या तिजोरीतील पैशांची उधळपट्टी चालू आहे. त्याला आळा घालावा, यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला आम्ही विनंती केली आहे. चिखली मतदारसंघात मागील १० दिवसांमध्ये २ सहस्र ६०० जणांनी निवडणूक आयोगाकडे नाव नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.’’

अनिल देसाई म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे वगळून महायुती रडीचा डाव खेळत आहे. स्वच्छ आणि पारदर्शी निवडणुकीच्या तत्त्वाला काळीमा फासला जात आहे. लोकशाहीसाठी हा काळीमा आहे. याविषयी निवडणूक आयोगाने त्वरित कठोर पावले उचलली पाहिजेत.’’ जितेंद्र आव्हाड यांनी अनेक मतदारसंघात मतदारांना मयत दाखवण्यात आले आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या प्रभावाखाली काम करत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला.