पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) यांच्याकडून पुणे येथील साधक-दांपत्य श्री. हनुमंत कुंभार आणि सौ. सुलोचना कुंभार यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी रुग्णाईत आहेत. पूर्वी पू. आजींचे वास्तव्य पुणे येथे असतांना तेथील साधक-दांपत्य श्री. हनुमंत कुंभार आणि सौ. सुलोचना कुंभार यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. निर्मला दातेआजी

१. श्री. हनुमंत श्रीपती कुंभार (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५८ वर्षे), पुणे

श्री. हनुमंत कुंभार

१ अ. पू. दातेआजींमुळे ‘सनातन संस्थे’शी संपर्क होऊन साधनेला आरंभ होणे : ‘वर्ष २००० मध्ये दाते कुटुंबियांमुळे आम्ही उभयता ‘सनातन संस्थे’च्या संपर्कात आलो. त्यानंतर आमच्या साधनेला आरंभ झाला. तेव्हापासून आम्हा दोघांनाही पू. निर्मला दातेआजींचा सहवास मिळाला.

१ आ. प्रेमळ : पू. दातेआजी नेहमी इतरांचा विचार करायच्या. त्यांच्या घरी आलेल्या प्रत्येकाची त्या आपुलकीने विचारपूस करायच्या. त्या ‘कधी कोणावर ओरडल्या किंवा कोणाशी मोठ्या आवाजात बोलल्या’, असे मी कधी पाहिले नाही.’

२. सौ. सुलोचना कुंभार (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५४ वर्षे), पुणे

२ अ. पू. दातेआजींनी कुंभार यांच्या कुटुंबाला आधार देणे : ‘पू. आजींचे माझ्या कुटुंबाकडे सतत लक्ष असायचे. त्या नेहमी माझी विचारपूस करायच्या. त्यांचा आम्हाला पुष्कळ आधार वाटतो. सध्या दाते कुटुंबीय सेवेनिमित्त रामनाथी आश्रमात वास्तव्यास आहेत, तरीही ‘ते सर्वजण पुण्यातच आहेत’, असे मला वाटते.

सौ. सुलोचना कुंभार

‘पू. दातेआजींनी दिलेल्या निरपेक्ष प्रीतीमुळे आम्ही त्यांच्या कुटुंबातीलच सदस्य आहोत’, असे वाटते. ‘कुटुंबाला जोडून कसे ठेवायचे ?’, हे त्यांनीच मला शिकवले.

२ आ. पू. आजींनी स्वयंपाकातील बरेच बारकावे शिकवणे : पू. आजींनी मला स्वयंपाकघरातील पुष्कळ सेवा शिकवल्या. पदार्थ बनवण्यापासून ते स्वयंपाकातील बरेच बारकावे त्यांनी मला शिकवले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ते सर्व कृतीत आणण्याचा प्रयत्न करते.

२ इ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा कशी ठेवायची ?’, हेही त्यांनी मला बर्‍याच प्रसंगांतून शिकवले.

मला पू. दातेआजींचा सहवास मिळाला आणि त्यांच्या अनमोल सान्निध्यामुळे साधनेच्या प्रवासात मला पुष्कळ लाभ झाला. त्याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.’

 सर्व सूत्रांचा दिनांक (२४.७.२०२४)    

पू. निर्मला दातेआजींच्या खोलीत गेल्यावर कुंभारदांपत्याला जाणवलेली सूत्रे

‘जून २०२४ पासून पू. दातेआजी रुग्णाईत असून ‘त्यांची शुद्ध हरपली आहे’, असे आम्हाला समजले. त्यामुळे ‘कधी एकदा पू. आजींना भेटतो’, असे आम्हाला झाले होते. आम्ही सेवेसाठी रामनाथी आश्रमात गेलो होतो. त्या वेळी आम्हाला पू. दातेआजींच्या दर्शनाचा लाभ झाला. त्यांच्या खोलीत गेल्यावर आम्हाला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. पू. दातेआजींचा चेहरा पुष्कळ आनंदी दिसणे

पू. आजींचा चेहरा पुष्कळ आनंदी आणि प्रकाशमान दिसत होता. त्यांना पाहून आम्हाला पुष्कळ प्रसन्न आणि आल्हाददायक वाटले. ‘त्या आजारी आहेत’, असे वाटतच नव्हते.

२. ‘पू. आजींचा नामजप आतून चालू आहे’, असे जाणवत होते.

३. पू. आजींनी डोळे उघडून पाहिल्यावर ‘त्या साधनेविषयी काहीतरी सांगत आहेत’, असे जाणवणे

आम्ही भेटायला आल्याचे सौ. ज्योती दाते (पू. आजींची मोठी सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी पू. आजींना सांगितले. तेव्हा पू. आजींनी डोळे उघडून आमच्याकडे पाहिले. त्या वेळी ‘त्या साधनेविषयी काही सांगत आहेत’, असे आम्हाला जाणवले.

४. पू. आजींच्या दर्शनाने मन आनंदी होऊन त्यांच्या सहवासातील क्षणांचे स्मरण होणे

पू. आजी पुणे येथे रहात असतांना आम्हाला त्यांचा सहवास लाभला. साधनेत येण्यापूर्वीपासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांनी आम्हाला घडवले आणि साहाय्य केले. त्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. निर्मला दातेआजी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. हनुमंत कुंभार आणि सौ. सुलोचना हनुमंत कुंभार, पुणे (२४.७.२०२४)