साधकांना आधार देऊन त्यांना भावपूर्ण सेवा करण्यात साहाय्य करणारे पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चैतन्य तागडे !

   ‘मला ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाच्या अभ्यासवर्गाची सेवा करत असतांना साधना सत्संगाचे दायित्व असलेले पुणे येथील श्री. चैतन्य तागडे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. चैतन्य तागडे

१. प्रेमभाव

१ अ. साधकांशी प्रेमाने आणि सहजतेने बोलणे : मला ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाच्या अभ्यासवर्गाची सेवा मिळाल्यावर माझा श्री. चैतन्य तागडे यांच्याशी संपर्क आला. दादा माझ्याशी ‘कॉन्फरन्स’वर प्रथमच बोलत असतांनाही ‘आमची अनेक वर्षांपासून ओळख आहे’, अशा प्रकारे सहजतेने आणि प्रेमाने बोलत होते.

१ आ. साधकाला आधार देऊन सकारात्मक करणे : माझ्यामध्ये पुढाकार घेण्याची वृत्ती अल्प असल्याने ‘सत्संग घेणार्‍या साधकांशी मी कसे बोलणार ?’, याचा मला ताण यायचा. माझ्या मनात ‘१ – २ आठवड्यानंतर ‘मला ही सेवा जमणार नाही’, असे सांगूया’, असा विचार आला. तेव्हा दादांनी प्रेमाने आणि आपुलकीने ‘तुम्हाला ही सेवा जमू शकते. आपण प्रयत्न करूया. गुरुदेवच ही सेवा करून घेणार आहेत’, असे माझ्या मनावर बिंबवले. त्यानंतर माझ्या मनातील नकारात्मक विचार नाहीसा झाला आणि माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले.

२. चुकांची तत्त्वनिष्ठतेने जाणीव करून देणे

श्री. दत्तात्रय पिसे

एकदा माझा अभ्यासवर्गात विषय मांडण्याचा नीट सराव झाला नव्हता. मी विषयाचा अभ्यास करायला पुरेसा वेळ न दिल्याने मला विषय नीट मांडता आला नाही. तेव्हा दादा मला म्हणाले, ‘‘आपल्या अभ्यासवर्गात अनेक सत्संगसेवक जोडलेले असतात. आपण त्यांचा वेळ वाया घालवून पाप ओढवून घ्यायचे का ? आवश्यक ते प्रयत्न करणे, इतकेच आपल्या हातात आहे. ‘झोकून देऊन तळमळीने अभ्यास करून गुरुदेवांचे मन जिंकायचे आहे’, हे ध्येय ठेवून सेवा करूया. ‘गुरुदेवांनी आपल्याला ही सेवा देऊन आपल्याला उद्धाराची संधी दिली आहे’, असा भाव ठेवूया.’’ त्यांचे बोलणे माझ्या अंतर्मनात ठसले आणि माझे सेवेप्रती गांभीर्य वाढले. त्यानंतर माझ्याकडून पुन्हा अशी चूक झाली नाही.

३. साधकांना अभ्यासवर्गात विषय मांडण्यास साहाय्य करणे

३ अ. विषयाचा आरंभ आणि शेवट प्रभावी होण्यासंदर्भात मार्गदर्शन करणे : ‘विषय मांडतांना सूत्रे कशी सांगायची ?’, याविषयी आमची चर्चा होत असे. तेव्हा दादा विविध विषयांतील सूत्रे अत्यंत प्रभावीपणे सांगत होते. केवळ गुरुकृपा, गुरुदेवांनी दिलेले ज्ञान आणि त्यांनी मांडलेली सूत्रे यांमुळे अभ्यासवर्ग अत्यंत प्रभावी होत असे. दादा ‘विषयाचा आरंभ कसा करावा ? आरंभापासून सर्वांमध्ये अंतर्मुखता कशी निर्माण होईल ? त्यांची जिज्ञासा वाढेल आणि सर्व जण शिकण्याच्या स्थितीत रहातील, तसेच विषयाचा शेवट कसा करावा ?’, याविषयी नेमकेपणाने सांगायचे. ते सांगायचे, ‘‘सत्संग ऐकल्यावर मार्गदर्शन कृतीत आणण्यासाठी सर्वांना प्रेरणा, प्रोत्साहन आणि साहाय्य मिळायला हवे.’’

३ आ. जिज्ञासूंच्या स्थितीचा विचार करून सूत्रे मांडण्यास शिकवणे : आम्ही सत्संगात मांडण्याच्या विषयांचा सराव करत असतांना दादा आमच्याकडे लक्ष देत असत. ‘सत्संगसेवकांनी कोणते सूत्र कसे सांगावे ? जिज्ञासूंना विषयाचे आकलन कसे होईल ? त्यांची साधना गतीने कशी होईल ?’ इत्यादी गोष्टींकडे दादा विशेष लक्ष देत असत.

४. अहं अल्प

दादांना विविध सूत्रे सुचल्यावर ते त्याचे श्रेय अत्यंत शरणागत होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देतात. ते इतक्या विनम्रतेने सांगतात की, आम्हालाही तसे शिकता आले आणि आमच्याकडून गुरुचरणी विनम्र अन् शरणागत रहाण्याचे प्रयत्न चालू झाले. दादा ‘त्यांनी कसे प्रयत्न केले ?’, याविषयी मनमोकळेपणाने सांगतात. त्यामुळे ती प्रक्रिया लक्षात येऊन आमच्याकडून तसे प्रयत्न होतात.

५. श्री. चैतन्य तागडे यांनी अभ्यासवर्ग घेतल्यावर साधक आणि जिज्ञासू यांना झालेले लाभ

५ अ. सत्संगसेवकांना झालेले लाभ

५ अ १. भावाच्या स्तरावर सूत्रे सांगितल्याने अभ्यासवर्गात आणि पुढे सत्संगात अत्यंत प्रभावीपणे विषय मांडता येणे : दादांनी आम्हाला सत्संगातील जिज्ञासूंना ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचा विषय अत्यंत सोपा करून कसा सांगायचा ?’, याविषयी सांगितले. अभ्यासवर्गाच्या आधी चर्चा करतांना दादा आमच्याकडून थोडा वेळ गुरुस्मरण करून घेतात. ते आम्हाला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्या विषयात काय अपेक्षित आहे ?’, हे भावावस्थेत जाऊन शिकायला सांगतात. त्या वेळी आमची एकत्रित चर्चा होत असे. या चर्चेत गुरुकृपेचा ओघच असायचा आणि त्यात सूत्रे अंतिम होत असत. त्यामुळे हे विषय सर्व अभ्यासवर्गांत आणि पुढे सत्संगात अत्यंत प्रभावी झाले.

५ अ २. अभ्यासवर्ग भावपूर्ण होणे आणि दादांच्या बोलण्यातून चैतन्य अन् आनंद मिळणे : दादा विविध सूचना सांगत असतांना ‘सर्व सत्संगसेवकांना केवळ ऐकतच रहावे’, असे वाटते. दादांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सत्संगसेवक यांच्याप्रती अपार भाव आहे. त्यामुळे अभ्यासवर्ग अत्यंत भावपूर्ण होतो. सत्संगसेवकांनीही सांगितले, ‘‘अभ्यासवर्ग अत्यंत भावपूर्ण होत आहेत.’’ दादांच्या बोलण्यातून सर्वांना चैतन्य मिळते. सर्व साधक अभ्यासवर्गानंतर अत्यंत उत्साही होतात.

५ आ. जिज्ञासूंना झालेला लाभ

५ आ १. जिज्ञासूंनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया मन लावून शिकण्याचा प्रयत्न केल्याने सत्संगात उत्साह वाढणे : नामस्मरणाविषयी माहिती असणार्‍या आणि तुलनेने सोप्या विषयाच्या वेळीही न बोलणारे अन् अल्प प्रतिसाद देणारे अनेक जिज्ञासू ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिये’च्या विषयात पुष्कळ रस घेऊ लागले. केवळ ‘दादांनी सांगितलेल्या पद्धतीने विषय मांडल्याने आणि परात्पर गुरुदेवांची कृपा’ यांमुळे हा विषय घेतला गेल्याने शेकडो जिज्ञासूंनी ही प्रक्रिया मन लावून शिकण्याचे प्रयत्न केल्याने सर्वच सत्संगांत उत्साह वाढला.

५ आ २. जिज्ञासूंच्या स्वभावात पालट होऊ लागणे : सत्संगानंतर जिज्ञासूंच्या स्वभावात पालट होऊ लागला. त्यांची अंतर्मुखता वाढू लागली. त्यांना ‘स्वतःची साधना चांगली होत आहे’, याची अनुभूती येऊ लागली. जिज्ञासूंच्या घरातील अन्य लोक आणि एकत्र बसून विषय अधून-मधून ऐकणारे या सत्संगाकडे आकर्षिले गेले अन् साधना करू लागले.

६. कृतज्ञता

या सेवेमुळे ‘कोणताही विषय मांडायचा असल्यास त्याची सिद्धता कशी करायची ? अभ्यास कसा करायचा ? गुरुदेवांना मनोमन शरण जाऊन ‘जाणुनी श्रींचे मनोगत’ यानुसार विषय कसा मांडायचा ?’, हे मला शिकायला मिळाले. या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाच्या दिव्य सेवेत सहभागी होऊन जिज्ञासूंची चांगली साधना होतांना आणि त्यांच्यात चांगले पालट होतांना मला पहाता आले. ‘त्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला’, ही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच कृपा आहे, हे मला अनुभवता आले. माझ्यात विषय मांडण्याची कोणतीही क्षमता नसतांना केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु स्वाती खाडये यांच्या कृपेने मला या सेवेची संधी मिळाली. त्यात मला सहभागी होता आले आणि पुष्कळ शिकता आले अन् आनंद घेता आला. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. दत्तात्रय पिसे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५० वर्षे), सोलापूर (१२.१.२०२२)