‘माझी आई श्रीमती शशिकला रवींद्र व्हटकर (वय ५५ वर्षे) हिचे १७.४.२०२४ या दिवशी निधन झाले. मागील २ वर्षांपासून मूत्रपिंडांच्या व्याधीमुळे तिला प्रत्येक आठवड्यात २ वेळा ‘डायलिसिस’ करावे लागायचे. (डायलिसिस : ‘मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया !’) प्रत्येक ‘डायलिसिस’च्या वेळी तिला ‘पुष्कळ वेदना होणे, थंडी वाजणे, श्वास घेता न येणे’, आदी त्रास व्हायचे. दीड वर्षाच्या कालावधीत आईला १२६ वेळा ‘डायलिसिस’ करावे लागले. या काळात आईला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर वेगवेगळ्या त्रासांना सामोरे जावे लागले. आईची सेवा करतांना गुरुकृपेने मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘रामनाथी आश्रमातून घरी जावे लागणार’, असे ठरवल्यावर साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची आठवण येणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वेगवेगळे उपाय सुचवून तिला धीर देणे
मी काही वर्षांपासून सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करत आहे. आईची प्रकृती ठीक नसल्याने मला आश्रमातून सोलापूर येथे घरी जावे लागणार होते. त्यामुळे मला प्रतिदिन सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची आठवण येऊ लागली. ‘आश्रम सोडून जायचे’, ही गोष्ट माझ्या मनाला स्वीकारता येत नव्हती. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला ‘आईचे आजारपण आणि साधना’ या संदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना सुचवून सतत धीर दिला. ‘घरी राहून आईची शुश्रूषा करण्यातूनही माझी साधना होणार आहे’, असे त्यांनी सांगितले.
२. घरी असतांना ‘कुलदेवीला केलेली प्रार्थना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना पोचली आहे’, असे मला प्रत्येक वेळी जाणवायचे.
३. रुग्णालयात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे
आईच्या प्रत्येक ‘डायलिसिस’च्या वेळी मला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर ‘डायलिसिसच्या युनिट’मध्ये फिरत आहेत आणि त्यांच्या तळहाताने आईसाठी नामजपादी उपाय करत आहेत’, असे दिसायचे.
४. ‘आजार होणे’ हे आपले प्रारब्ध असून ते नामजपानेच न्यून होणार ’, या श्रद्धेने आईने नामजप करणे अन् त्यामुळे इतक्या त्रासातही आईचा चेहरा चांगला दिसणे आणि आधुनिक वैद्यांनी आईचे कौतुक करणे
दीड वर्षाच्या या कालावधीत आईला वेगवेगळ्या त्रासांना सामोरे जावे लागले. आम्हाला तिचे त्रास पहाणेही असह्य व्हायचे; मात्र तिने त्या सगळ्यांवर धिराने मात केली. ‘हे सर्व प्रारब्ध असून नामजप केल्यानेच ते न्यून होत आहे’, याची तिला कित्येक वेळा अनुभूती आली होती. त्यामुळे ‘कितीही त्रास सहन करावा लागला, तरी नामजप करायलाच पाहिजे’, ही आईची श्रद्धा दृढ झाली होती. आईने एक वर्षभर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय प्रतिदिन पूर्ण केले. नामजप करत असल्याने इतक्या त्रासातही आईचा चेहरा चांगला दिसायचा. तिच्यावर उपचार करणारे आधुनिक वैद्यसुद्धा तिचे कौतुक करायचे. केवळ नामजपामुळे अन्य रुग्णांच्या तुलनेत आई अधिक काळ जगू शकली. याचे कारण अशा प्रकारच्या रुग्णाने परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य गमावलेले असते.
५. साधिकेने आईसह सोलापूर येथील सेवाकेंद्रात येऊन १० मास रहाणे आणि तेथील चैतन्यामुळे आईला थोडे बरे वाटून साधिकेच्या मनातील निराशेचे विचार न्यून होणे
उपचारांसाठी सोलापूरला घरी रहात असतांना काही अडचणी आल्यामुळे आम्ही सोलापूर येथील सेवाकेंद्रात राहू लागलो. साधारण १० मास आम्ही तेथे राहिलो. मला तेथे थोडी सेवाही करता आली आणि तेथील चैतन्यामुळे घरातील अडचणीही न्यून झाल्या. ‘आईसाठी वेळ द्यावा लागेल आणि आता मला सेवा करता येणार नाही’, ही माझी चिंता देवानेच दूर केली. आईला नामजप करण्यासाठी पोषक वातावरण मिळाल्याने तिलाही आनंद झाला. नंतर आईला थोडे बरे वाटू लागले आणि तीसुद्धा जमेल ती सेवा करू लागली. आईच्या आजारपणामुळे माझ्या मनात आलेले निराशेचे विचार आणि भविष्याची काळजी दूर झाली.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांच्यामुळे साधिका अन् तिची आई यांच्यामध्ये सकारात्मक पालट होणे
आईची सेवा म्हणजे माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला या संकटाला सामोरे जाण्याचे अमाप बळ दिले. पू. दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या संत) यांनी तत्त्वनिष्ठतेने माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतला. त्यामुळे मला साधनेचे प्रयत्न करता आले. संतांचा सहवास देऊन देवाने आमचे कल्याणच केले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांच्यामुळे या १० मासांच्या कालावधीत आईमध्ये, तसेच माझ्यातही सकारात्मक पालट झाले.
७. आईचे देहावसान झालेल्या दिवशी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सगळा भार उचलला आहे’, याविषयी आलेल्या अनुभूती
७ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी आईला दोन्ही हातांनी उचलले आहे’ आणि ‘एका मागे एक, असे अनेक परात्पर गुरु डॉक्टर उभे आहेत’, असे दिसणे : श्रीरामनवमीच्या दिवशी (१७.४.२०२४), म्हणजे शेवटच्या दिवशीही आई पूर्ण दिवसभर नामजप करत होती. ज्या क्षणी आईने प्राण सोडला, त्याच क्षणी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी आईला त्यांच्या दोन्ही हातांनी उचलले आहे’ आणि ‘एका मागे एक, असे अनेक परात्पर गुरु डॉक्टर उभे आहेत’, असे मला दिसले. असे दृश्य मला पहिल्यांदाच पहायला मिळाले. प्राण सोडतांना आईचा चेहरा पूर्ण निश्चिंत झाला होता. त्या वेळी आधी माझ्या मनात काळजीचे विचार होते; पण नंतर आपोआपच ते विचार नाहीसे झाले आणि माझ्यात स्थिरता आली.
७ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आईच्या कानाजवळ श्रीकृष्णाचा नामजप लावून ठेवायला सांगणे : आईच्या मृत्यूनंतर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी भ्रमणभाष करून मला धीर दिला. त्यांनी मला आईच्या कानाजवळ श्रीकृष्णाचा नामजप लावून ठेवायला सांगितले. हे सर्व करतांना ‘मी एखादी सेवाच करत आहे’, असे मला वाटत होते.
७ इ. दिवसकार्य करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आईला पुढील गती मिळत आहे’, याची अनुभूती येणे : आईच्या निधनानंतरच्या प्रत्येक दिवशी ‘एका मागोमाग उभे असणार्या परात्पर गुरु डॉक्टरांनी आईचा देह त्यांच्या मागे उभ्या असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या हातात दिला आहे’, असे मला सलग १३ दिवस स्पष्टपणे दिसत होते.
श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीरामरूपी गुरुदेवांनी आईला तीव्र प्रारब्धातून मुक्त केले. याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
८. ‘आईच्या निधनानंतर दहाव्या आणि तेराव्या दिवशीच्या विधीपर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी आईच्या लिंगदेहाची काळजी घेतली’, असे दिसणे
८ अ. दहावा दिवस : या दिवशी विधीला आरंभ केल्यावर ‘आईच्या लिंगदेहाला आश्चर्य वाटून काळजी वाटत आहे’, असे मला दिसले. नंतर विधी पूर्ण होत असतांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी आईला रथात बसवले असून ते स्वतः रथ चालवत आहेत’, असे मला दिसले.
८ आ. बारावा दिवस : या दिवशी विधीला आरंभ झाल्यावर मला ‘आई परात्पर गुरु डॉक्टरांच्या रथात शांतपणे बसली आहे आणि तिच्यासाठी चालू असलेल्या विधींकडे पहात आहे’, असे दिसले.
८ इ. तेरावा दिवस : पितरांना विधीवत् गोड नैवेद्य अर्पण करतांना ‘वरच्या दिशेने आमच्याकडे शुभ्र प्रकाशझोत येत आहे’, असे मला दिसले.
८ ई. विधी करणार्या पुरोहितांना (श्री. अरुण गजरे यांना) वातावरणात हलकेपणा जाणवत होता.
९. संत आणि साधक यांच्या तळमळीमुळे विधींतील सर्व अडचणी दूर होणे
सोलापूर सेवाकेंद्रातील सर्वच साधकांनी आईच्या अंत्यविधीच्या वेळी आम्हाला साहाय्य केले आणि आमची काळजी घेतली. ते पूर्णवेळ आमच्या सोबत राहिले. सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. दीपाली मतकर यांच्या तळमळीमुळे विधींतील अडचणी आपोआप दूर झाल्या. ‘सर्व विधींच्या वेळी जे जे साहाय्य करत होते, त्या प्रत्येकात मला कधी ‘गुरुदेव’, कधी पंचा खांद्यावर टाकत असलेला ‘भगवान श्रीकृष्ण’, तर कधी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई’, असे सर्वजण दिसत होते. त्यामुळे मी शेवटपर्यंत मनाने खंबीर राहिले आणि सर्व गोष्टी करू शकले.
गुरूंची महती कळायला माझी अल्प बुद्धी असमर्थ आहे; पण ‘गुरूंचे दिव्य सामर्थ्य साधकांना कितीही कठीण परिस्थितीतून तारून नेऊ शकते’, याची मला अनुभूती घेता आली. त्याबद्दल मी श्री गुरूंच्या चरणी अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. गीता व्हटकर (कै. श्रीमती शशिकला व्हटकर यांची मुलगी), सोलापूर (१५.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |