११ ते १३.१०.२०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एका शिबिराच्या समारोपाच्या सत्रात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मोक्षगुरु असल्याने साधकांसाठी हा सुवर्णकाळ आहे !
‘‘आपल्या पूर्वपुण्याईने आपल्याला मनुष्यजन्म लाभला आहे. आपल्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले गुरु म्हणून लाभले आहेत. साधकांसाठी हा समृद्धीचा काळ आहे. या कलियुगात आपली पात्रता नसतांना आपल्याला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव मोक्षगुरु म्हणून लाभले आहेत.
२. साधना म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तन करणे आहे. साधकांनी स्वतःमध्ये गुणवृद्धी करून स्वभावदोषांचे निर्मूलन करायचे आहे.
३. साधना करण्याचे महत्त्व
आपल्यामध्ये चैतन्याची वृद्धी होण्यासाठी साधना करून आपले आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणे पुष्कळ महत्त्वाचे आहे.
४. सहसाधकांप्रती ठेवायचा भाव
‘उत्तरदायी साधक किंवा सहसाधक यांच्या माध्यमातून गुरु किंवा देवता सांगत आहेत’, असा विचार करून साधकांनी त्यांनी सांगितल्यानुसार कृती करणे अपेक्षित आहे.
५. सेवाभाव
अ. साधकांनी प्रत्येक सेवा झोकून देऊन आणि परिश्रम घेऊनच करायला हवी; कारण सेवेतूनच साधक घडत असतात.
आ. या कलियुगात साधकांनी दिवस-रात्र प्रयत्न करायला हवेत. साधक गुरुपौर्णिमेनिमित्तच्या सेवा देहबुद्धी विसरून करतात, त्याप्रमाणेच साधकांनी प्रत्येक दिवशी झोकून देऊन सेवा करायला हवी.
६. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व
अ. कुणीही साधकांना त्यांच्या चुका सांगितल्यास ‘गुरुच त्यांच्या माध्यमातून चुका सांगत आहेत’, असा दृष्टीकोन ठेवून साधकांनी प्रयत्न करायला हवेत.
आ. काही वेळा साधकांच्या मनात नकारात्मक विचार येतात. तेव्हा ‘या विचारांच्या मुळाशी नेमके काय कारण आहे ?’, ते संबंधित साधकांनी शोधून त्यावर प्रयत्न करायला हवेत. साधकांच्या मनात येणारे नकारात्मक विचार आध्यात्मिक त्रासामुळे येत असतील, तर साधकांनी नामजपादी उपाय करून त्यावर मात करावी. स्वतःमधील स्वभावदोषांमुळे साधकांच्या मनात नकारात्मक विचार येत असल्यास ते न्यून करण्यासाठी साधकांनी त्यावर स्वयंसूचना घ्याव्यात.
इ. साधकांना स्वतःच्या मनातील अहंचा विचार लक्षात येत असेल, तर ते प्रगतीचे लक्षण आहे; मात्र हे अहंचे विचार न्यून होण्यासाठी त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. आपल्यातील रज-तमाच्या आधिक्यामुळे आपल्या मनात निरर्थक विचार येतात. आपले मन शांत झाल्यावर हळूहळू आपल्या मनात सत्चे आणि देवाविषयीचे विचार येतात. नंतर आपल्या मनातील तेही विचार न्यून होऊन आपले मन निर्विचार होते. आपण ही निर्विचार अवस्था अधूनमधून अनुभवतो. आपली साधनेत जशी प्रगती होईल, तसे आपले मन शांत आणि स्थिर होते.
ई. साधकांनी मनशुद्धी होण्यासाठी स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं न्यून करून श्रद्धा वृद्धींगत करणे अपेक्षित आहे. ‘साधनेच्या आरंभी स्वतःत त्रिगुणांचे (सत्त्व, रज आणि तम यांचे) प्रमाण किती होते, म्हणजे त्रास किती होता ? आता तो किती न्यून झाला ? किती प्रगती झाली ?’, याचा साधकांनी आढावा घ्यावा.
उ. स्वतःमधील स्वभावदोषांचे निर्मूलन होण्यासाठी साधकांनी योग्य दृष्टीकोन ठेवल्यास त्यांच्याकडून योग्य कृती होईल. ‘समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजून घ्यायला हवे’, असा विचार करून साधक त्यात अडकतात. साधकांनी तसे न करता स्वतःला आणि इतरांना घडवण्याचा विचार करायला हवा. साधकांना त्यांच्या चुका दाखवल्यास काही वेळा ते निराश होतात. साधकांनी निराश न होता सतत गुरुस्मरण करावे.
ऊ. ‘साधकांमधील एकेका स्वभावदोषामुळे होणार्या दृष्टीकोनात पालट होणे आणि त्यांच्यात एकेक गुणाची वृद्धी होणे’, हेही प्रगतीचे लक्षण आहे. साधकांची प्रगती होत आहे; मात्र त्यांची गती न्यून आहे.
ए. ‘माझ्यामुळे काहीच होत नाही, तर गुरूंच्या कृपेनेच सर्व होते. हे कार्य आणि साधक देवाचेच आहेत’, असा आपला भाव नेहमीच असायला हवा. साधना, म्हणजे गुरूंनी शिकवल्यानुसार क्रियमाणाचा वापर करणे होय. साधकांना साधना आणि सेवा यांचा अखंड ध्यास असायला हवा.’’
– श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरू (१५.१०.२०२२)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |