निरोगी जीवनासाठी व्यायाम – भाग १८
सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारांसह अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत.
‘शरिराला ‘मनाचा आरसा’ म्हटले जाते. मनात येणार्या सूक्ष्मातिसूक्ष्म विचारांचा शरिरावर दृश्य आणि अदृश्य परिणाम होत असतो. व्यायामाची गुणवत्ता आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. मन आनंदी असले, तर व्यायाम अधिक परिणामकारक होऊन उत्साह वाढतो. सकारात्मक मानसिक स्थिती असलेल्या, म्हणजे आनंदी आणि उत्साही व्यक्तीला व्यायाम करण्याची अधिक इच्छा असते. उत्साही मनामुळे व्यायाम करतांना शरिरातील ऊर्जा वाढते आणि कार्यक्षमता सुधारते. याउलट जर मनात ताण, चिंता िकंवा निराशा असेल, तर व्यायाम केल्यावर लवकर दमायला होते आणि व्यायामाचा अपेक्षित लाभ दिसून येत नाही. त्यामुळे दिवसभरातील ताण-तणाव दूर करून आणि मन सकारात्मक ठेवून व्यायाम करणे आवश्यक आहे. यासाठी व्यायाम करतांना ‘श्वासावर लक्ष एकाग्र करणे, नामजप करणे, बारीक आवाजात उत्साहवर्धक संगीत लावणे, आपल्या उद्दिष्टांचे स्मरण करणे, मनोमन प्रार्थना करणे’, असे प्रयत्न करू शकतो.
व्यायामामुळेही मनाच्या स्थितीत सकारात्मक पालट घडवता येतात. शारीरिक हालचालींमुळे आनंदी आणि सकारात्मक भावना निर्माण करणार्या एंडोर्फिन, डोपामाईन अन् सेरोटोनिन यांसारख्या रसायनांचे स्रावाचे प्रमाण वाढते. नियमित व्यायामाने ताण आणि चिंता न्यून होत असल्याने व्यक्तीला मानसिक शांती मिळते. सकारात्मक मानसिकता व्यायामाला प्रोत्साहित करते, तर नियमित व्यायाम मनाच्या स्थितीत सुधारणा घडवून आणतो. अशा प्रकारे हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक असतात.’
– श्री. निमिष त्रिभुवन म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (३०.९.२०२४)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise