‘रयत शिक्षण संस्थे’चे हितचिंतक महावीर कवठेकर यांना ‘प्रतिभावंत गुरु सन्मान पुरस्कार’ प्रदान !

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना धर्मप्रेमी श्री. महावीर कवठेकर (डावीकडे)

सांगली, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘ऑल रजिस्टर न्यूज पेपर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने सनातन संस्थेचे हितचिंतक आणि धर्मप्रेमी श्री. महावीर बापूसाहेब कवठेकर यांना ‘प्रतिभावंत गुरु सन्मान पुरस्कार-२०२४’ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. कुपवाड येथील ‘कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स’ येथे हा कार्यक्रम झाला. रयत शिक्षण संस्थेच्या साखरपा (जिल्हा रत्नागिरी) येथील महात्मा गांधी विद्यालय आणि बाबासाहेब कोलते ज्युनियर महाविद्यालयामध्ये श्री. कवठेकर ‘इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी’ हा विषय शिकवतात. या विषयांतर्गत विविध प्रकल्प आणि प्रतिकृती बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना श्री. कवठेकरगुरुजी यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे सर्वच विद्यार्थी उत्तम गुणांसह उत्तीर्ण होतात. नेहमीच १०० टक्के निकाल देण्याची त्यांची परंपरा आहे.

याचसमवेत विद्यार्थ्यांसाठी संस्कारवर्ग, गुणसंवर्धन, नैतिक मूल्यांचे संवर्धन, व्यसनमुक्ती अभियान यांसह शाळेतील सर्व उपक्रमांत श्री. कवठेकरगुरुजी सहभागी असतात. त्यांच्या या योगदानामुळे ही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना नावलौकिक प्राप्त झाला आहे. श्री. कवठेकरगुरुजी हे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार सेवा आणि साधना करतात. ‘श्रीगुरुकृपेनेच मला हा पुरस्कार मिळाला आहे’, असे त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.