नगर येथील ‘शारदीय महोत्सव’
नगर – अठरा महापुराणांसमवेत अठरा उपपुराणे आहेत. उपपुराणांमध्ये देवीपुराणाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. पुराणात वर्णिलेले आदिशक्तीचे महत्त्व श्रद्धावंत भाविकांना प्रभावित करते. नवरात्रोत्सवात या आदिशक्तीचे सान्निध्य अनुभवून जीवनातील परमशांती-समाधान मिळवा, असे आवाहन प्रवचनकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले. येथील महाजन गल्लीतील गायत्री मंदिरात सनातन धर्मसभेने आयोजित केलेल्या शारदीय महोत्सवात प्रवचन सेवा करतांना ते बोलत होते.
धर्मसभेचे अध्यक्ष वेदमूर्ती श्री. दत्तोपंत पाठक गुरुजी यांनी परिचय करून देतांना सलग दुसर्या वर्षी श्री. मिलिंद चवंडके यांना त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रवचन सेवेमुळे शारदीय महोत्सवात निमंत्रित केले आहे, तसेच धर्मसभेच्या शतकमहोत्सवी सोहळ्यात त्यांनी केलेले कार्य आम्हा सर्वांना मोलाची साथ देणारे होते, असे सांगितले.
कार्यक्रमास धर्मसभेचे मंत्री दिनकर देशमुख, विश्वस्त राजेंद्र नगरकर, समीर उपाध्ये, व्यवस्थापक अनंतराव देशपांडे, तसेच एन्.डी. कुलकर्णी, सुनिल खिस्ती, राजेंद्र भागानगरे, भगवान हरबा, राजेंद्र परदेशी, प्रवीण सोनी, दिलीप शहापूरकर, यश खिस्ती, मारुति बारसे, सौ. स्नेहा खिस्ती, सौ. सोनाली चवंडके, सौ. सरोज सोनी यांचेसह भाविक उपस्थित होते.
श्री. चवंडके पुढे म्हणाले, ‘‘महादेवांसह सर्व देवांच्या मुखामधून जे तेज निघाले तीच भवानी जगदंबा. त्रैलोक्याची जननी अंबा. महालक्ष्मी. भगवान विष्णूला जागवण्यासाठी ब्रह्मदेवाने १४ श्लोकांचे रात्रिसूक्त म्हटले तेव्हा महाकाली प्रगट झाली. पार्वतीच्या देहामधून महासरस्वती अवतरली. महालक्ष्मी हीच महाकाली हीच महासरस्वती महामाया जगदंबा. या आदिमायेनेच ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेवांना उत्पत्ति- स्थिती-प्रलय याकरिता सामर्थ्य प्रदान केले. संकटांचे निवारण करण्यास, दुःखांचा संहार करण्यास, शत्रूंचा नाश करण्यास तुम्ही बोलवाल तेव्हा येईल, असे सांगितले आहे. माया, बुद्धी, चेतना, निद्रा, क्षुधा, तृष्णा, छाया, शांती, शक्ती, लज्जा, श्रद्धा, कांति, लक्ष्मी, वृत्ती, भ्रांती, स्मृती, दया, तुष्टी, मोह, मातृरूप अशा सर्व रूपात आदिशक्तीच असल्याने आपण आदिशक्तीचे सान्निध्य नित्य अनुभवतच असतो. सर्वस्वरूपातील सर्वेश्वरी, विश्वाची स्वामिनी विश्वात्मिका आहे. पंचमहाभूतांवर सत्ता असलेली ही जगदंबा देवांच्या कार्यासाठी अयोनिसंभव अवतार घेते. बहुशक्तिरूप घेऊन असुरांचे निर्दालन करते.
रावण वधासाठी ब्रह्मदेवाने महामायेस जागृत केले. आश्विन शुक्ल प्रतिपदेस रात्रीच्या समयी ही महामाया जागी झाली. ब्रह्मदेवांच्या प्रार्थनेने देवीने श्रीरामास जय मिळेल, असा वर दिला. सर्व देव आणि ऋषिंनी मिळून रावण मरेपर्यंत जगदंबेची आराधना करण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे कलश स्थापन करून देवीपूजन करत अनुष्ठान सुरू केले. देवीच्या आज्ञेनेच अहोरात्र युध्द चालले. अष्टमीस रावणाचा वध झाला. नवमीस होम-पारणे करण्यात आले. आश्विन शुध्द दशमीला श्रीरामांनी सिमोल्लंघन केले.
नवरात्र विधीविषयी श्रीदेवीमाहात्म्य, सप्तशती, कालिकापुराण या ग्रंथात वर्णन करताना हिंसा करू नये. आमिष (मांस) वर्जन करावे, असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्यामुळे आदिशक्तीची नवरात्रौत्सवात उपासना करताना जीवनभर शुध्द शाकाहारी राहिल, कोणतेही व्यसन करणार नाही, असा संकल्प करावा. देवीच्या कथांचे निरूपण नवरात्रौत्सवात व्हावे, भाविकांना देवीच्या कथांचे श्रवण करता यावे म्हणून सनातन धर्मसभा शारदीय महोत्सवाचे आयोजन करत आहे, हे कौतुकास्पदच होय, असे श्री.चवंडके यांनी सांगितले.
धर्मसभेचे कोषाध्यक्ष हभप श्री. निळकंठराव देशमुख यांनी आभार मानतांना विविध ग्रंथांमधील श्लोकांचे संदर्भ आणि त्यामधील बारकावे श्रोत्यांच्या पुढ्यात ठेवत श्री. मिलिंद चवंडके यांनी फुलवत नेलेले प्रवचन उपस्थित सर्वांना भावले असे सांगितले.