Provision of death penalty : भारतासह जगातील ५५ देशांत फाशीच्या शिक्षेची तरतूद : चीन आघाडीवर !

वॉशिंग्टन (अमेरिका) – आजही जगात असे जवळपास ५५ देश आहेत, जिथे मृत्यूदंडाची तरतूद आहे. या देशांत भारताचाही समावेश आहे. ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’च्या आकडेवारीनुसार भारताच्या शेजारी देश चीनमध्ये सर्वाधिक फाशीची शिक्षा दिली जाते. चीन त्याची आकडेवारी सार्वजनिक करत नसल्यामुळे नेमकी आकडेवारी सांगणे कठीण आहे. याचसमवेत देहांत शिक्षा देण्यात पाकिस्तानही पुष्कळ पुढे आहे.

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’च्या म्हणण्यानुसार चीननंतर इराण हा सर्वाधिक मृत्यूदंड देणारा देश आहे. येथे ५७६ हून अधिक लोकांना फाशी देण्यात आली. यानंतर सौदी अरेबिया (१९६), इजिप्त (२४), अमेरिका (१८), सिंगापूर (११), इराक (११), कुवेत (७), सोमालिया (६ हून अधिक) आणि सुदान (५ हून अधिक) समाविष्ट आहेत. किती कालावधीत या शिक्षा देण्यात आल्या, हे स्पष्ट झालेले नाही.

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांमध्ये तब्बल २६ टक्के एकट्या पाकिस्तानातील !

अ‍ॅम्नेस्टीच्या अहवालानुसार पाकिस्तानचाही जगातील सर्वाधिक फाशीची शिक्षा देणार्‍या देशांमध्ये समावेश होतो. जगभरात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले तब्बल २६ टक्के कैदी एकट्या पाकिस्तानात आहेत. या अहवालानुसार पाकिस्तानमध्ये वर्ष २००४ पासून आतापर्यंत किमान ४ सहस्र ५०० लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे; म्हणजेच न्यायालयाकडून प्रतिवर्ष सरासरी एका व्यक्तीला ही शिक्षा सुनावली जाते.