दसरा : परंपरा, इतिहास आणि महत्त्व !

हिंदूंचा एक प्रमुख सण आणि शुभ दिवस दसरा !

आश्विन शुक्ल दशमीला ‘विजयादशमी’ किंवा ‘दसरा’ म्हणतात. आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे नवरात्र असते. याची समाप्ती या दिवशी होते. शुंभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर या राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला आणि ९ दिवस या राक्षसांसमवेत युद्ध केले. दशमीला महिषासुराचा वध करून तिने अंतिम विजय संपादन केला; म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात.

कौत्सास १४ कोटी सुवर्णमुद्रा देण्यासाठी रघुराजाने कुबेरावर स्वारी केली. त्यामुळे भयग्रस्त होऊन कुबेराने याच दिवशी शमीच्या झाडावर सुवर्णवृष्टी केली. आवश्यक तेवढे सोने रघुराजाने कौत्सास देऊन बाकीचे नागरिकांना वाटले, अशी कथा स्कंदपुराणात आहे. या दिवशी सोने लुटण्याच्या प्रथेचा संबंध या कथेशी आहे. साधारणपणे त्रेतायुगापासून साजरा केला जाणारा दसरा हा सण असून याला हिंदु धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.

याच दिवशी भगवान रामाचा पूर्वज रघू या अयोध्याधीश राजाने विश्वजित यज्ञ केला होता. त्या काळापासून म्हणजे त्रेतायुगापासून हिंदु लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात. या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता, तेव्हापासून हा दिवस विजयोत्सव अर्थात् विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. विजयाची प्रेरणा देणारा हा सण आहे.

– श्री. विवेक भोर (साभार : दैनिक ‘नवराष्ट्र’)

‘आश्विन शुक्ल दशमीच्या दिवशी आकाशात तारका दिसू लागताच विजय नावाचा मुहूर्त असतो, त्या वेळी जे काम हाती घ्याल, त्यात यश मिळते’, असे पुराणात सांगितले आहे.

– श्री. विवेक भोर (साभार : दैनिक ‘नवराष्ट्र’)    


शास्त्र आणि शस्त्र पूजन !

प्राचीन काळापासून क्षत्रिय युद्धाला जाण्यासाठी दसरा या दिवसाची निवड करत. ‘दसर्‍याच्या दिवशी केलेल्या युद्धात निश्चितच विजय मिळतो’, असे ते मानत. क्षत्रियांप्रमाणे ब्राह्मण लोकही दसर्‍याच्या दिवशी विद्या ग्रहण करण्यासाठी घराबाहेर पडत. व्यापारी लोक विजयादशमीच्या पवित्र दिवशी नवीन दुकान, ‘शोरूम’ यांचा शुभारंभ करणे शुभ मानतात.

– श्री. विवेक भोर (साभार : दैनिक ‘नवराष्ट्र’)


दसर्‍याच्या शुभ दिवशी काय करावे ? 

   

१. या दिवशी शमी किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करतात. शमी वृक्षाजवळच भूमीवर अपराजितादेवीचे चित्र रेखाटून तिचीही पूजा करतात. रावणाचा वध करण्यासाठी रामाने याच दिवशी शमीचे पूजन करून प्रस्थान ठेवले. अर्जुनाने अज्ञातवास संपवून याच दिवशी शमीचे पूजन केले आणि आपली शस्त्रे पुन्हा हातात घेतली.

२. ‘हा विजयोत्सव असल्याने राजांनी आपल्या घोड्यांना सुशोभित अलंकार घालावेत. ‘निराजन’ नावाचा विधी करावा, शस्त्रास्त्रांचे पूजन करावे आणि विजयासाठी प्रस्थान करावे’, असे सांगितले आहे.

३. दसर्‍याला शमी वृक्षपूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या ९ दिवसांत प्रत्येक दिवशी संध्याकाळी शमी वृक्षपूजन केल्याने आरोग्य आणि धनसंपत्ती प्राप्त होते, असे मानले जाते.

४. आपट्याच्या वृक्षाला ‘अश्मंतक’ म्हटले जाते. आपट्याची पाने पित्त आणि कफ दोषांवर गुणकारी आहेत. विजयादशमीला आपट्यांची पाने एकमेकांना दिली जातात. यालाच ‘सोने लुटणे’ असेही म्हणतात.

५. दसरा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करत.

६. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या ताटात ९ धान्यांची पेरणी केली जाते. दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातील भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात.

– श्री. विवेक भोर (साभार : दैनिक ‘नवराष्ट्र’)


दसर्‍याला पाटीवर सरस्वतीची प्रतिमा का काढली जाते ? 

पाटीवरील सरस्वतीची प्रतिमा  

दसर्‍याविषयी म्हटले जाते की, देवीने राक्षसांशी १० दिवस युद्ध करून दसर्‍याच्या दिवशी विजय मिळवला. काही लोक म्हणतात, ‘पांडव त्यांचा वनवास आणि अज्ञातवास संपवून दसर्‍याच्या दिवशी युद्धासाठी सज्ज झाले होते.’ काही जण म्हणतात, ‘आजच्या दिवशी प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा पराभव केला होता; म्हणून या दिवशी रावणदहन केले जाते. आपट्याची पाने वाटून जुने क्लेश संपवतात.’ काही लोक स्वतःकडील उपकरणे, अवजारे आणि विद्या यांची पूजा करतात. त्यात सरस्वतीची एक प्रतिमा काढली जाते. दसर्‍याच्या दिवशी सरस्वतीची प्रतिमा काढून लहानपणी आपण ती शाळेतही घेऊन जायचो. संध्याकाळी अशीच प्रतिमा कुंकू किंवा लेखणी यांनी काढून आपल्या वडीलधार्‍या व्यक्ती सरस्वतीची पूजा करत. त्या त्रिकोणाकृती बीजमंत्राचा उपयोग करून हे सरस्वती यंत्र काढले गेले आणि प्रचलित झाले. असे हे सरस्वती यंत्र थोड्याफार फरकाने सरस्वतीविषयक ग्रंथात सापडते. तंत्रशास्त्रातील कोणतेही यंत्र हे बीजमंत्राचे प्रकटीकरण असते. अशी अनेक यंत्रे बहुदा सर्वच देवी-देवतांची असतील. ही आकृती म्हणजे बीजमंत्राचे प्रतिकात्मक आकृतीरूप असलेले लघुरूप आहे.

– रश्मी डोंगरे (साभार : दैनिक ‘नवराष्ट्र’)