६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) यांना देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती !

‘१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग झाला. तो याग ‘ऑनलाईन’ पहातांना कु. अपाला औंधकर यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

मेधा-दक्षिणामूर्ति यागाचे यज्ञकुंड

१. ‘मेधा दक्षिणामूर्ति’ याग चालू झाल्यावर ‘श्री दक्षिणामूर्ति’ यांचे दर्शन होऊन त्यांनी आशीर्वाद दिला’, असे जाणवणे

‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग आरंभ झाल्यावर सर्वप्रथम मला सूक्ष्मातून ‘श्री दक्षिणामूर्ति’ यांचे दर्शन झाले. ‘देव नृत्याच्या माध्यमातून तुझ्याकडून समष्टी साधना करून घेणार आहे’, असे सांगून त्यांनी मला आश्वस्त केले. त्यांनी त्यांचा उजवा हात माझ्या डोक्यावर ठेवला. तेव्हा मला माझ्या सहस्रारामध्ये पांढरा प्रकाश दिसला आणि तो प्रकाश माझ्या संपूर्ण देहामध्ये पसरला. त्यामुळे माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण वेगाने दूर होऊ लागले.

कु. अपाला औंधकर

२. देवाने सूक्ष्मातून ‘श्री दक्षिणामूर्ति’ लोकात नेऊन ‘श्री दक्षिणामूर्ति’ लोकाचे दिव्य दर्शन घडवणे

मी डोळे मिटले. तेव्हा देवाने मला सूक्ष्मातून ‘श्री दक्षिणामूर्ति’ लोकात नेले. तेथे मला आठही दिशांना ज्ञानाचे पिवळे मोठे गोळे दिसले. ज्ञान खोल आणि अनंत आहे, त्याचप्रमाणे ‘श्री दक्षिणामूर्ति’ लोकही खोल, अनंत आणि दिव्य आहे. ‘तिथे एक दिव्य नदी (जलाशय) असून ती ज्ञानगंगेचे प्रतीक आहे’, असे मला वाटले. (‘श्री दक्षिणामूर्ति’ यांच्या चित्रामध्येही जलाशय दाखवला आहे. याविषयी मला ठाऊक नव्हते; परंतु चित्र पाहिल्यावर ‘मला दिसलेला जलाशय हाच असावा’, असे लक्षात येऊन कृतज्ञता व्यक्त झाली.) ‘श्री दक्षिणामूर्ति’ ही ज्ञानाची देवता असल्याने त्या लोकात श्री सरस्वती आणि श्री गणपति यांचाही नित्य वास आहे. तिथे मला श्री सरस्वतीदेवीच्या ‘मयूर’ वाहनाचे दर्शन झाले, तसेच काही सात्त्विक पुरोहित तिथे मंत्रपठण करतांना दिसले. त्यांच्याभोवती सात्त्विक ज्ञानशक्तीचे पिवळे कवच होते. मी हे सर्व सूक्ष्मातून अनुभवत असूनही ‘मी प्रत्यक्षच त्या लोकात गेले आहे’, असे वाटून मला अत्यानंद होत होता.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

३. ‘श्री दक्षिणामूर्ति’ देवतेच्या २ कार्यरत शक्ती दिसणे

मला ‘श्री दक्षिणामूर्ति’ देवतेच्या २ शक्तींच्या लहरी रंगस्वरूपात दिसल्या.

– कु. अपाला औंधकर

४. ‘श्री दक्षिणामूर्ति’ याग पहातांना कु. अपाला हिला आलेल्या अनुभूती आणि त्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले ज्ञानमय विश्लेषण

४ अ. अनुभूती – ‘याग पहातांना ‘माझ्या अनाहतचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत चांगली स्पंदने जाणवली आणि त्या मार्गाची शुद्धी होत आहे’, असे मला जाणवले.’ – कु. अपाला औंधकर

४ अ १. अनुभूतीमागील अध्यात्मशास्त्र : ‘यागाच्या वेळी कु. अपालाची प्रथम भावजागृती झाली आणि त्यानंतर तिला ‘दक्षिणामूर्ती यागाच्या’ संदर्भात अनुभूतीजन्य ज्ञान मिळाले. ‘भाव’ हा अनाहतचक्राशी, तर ‘सूक्ष्म-ज्ञान’ हे आज्ञाचक्राशी संबंधित आहे. त्यामुळे ही सूक्ष्म-प्रक्रिया घडत असतांना तिच्या कुंडलिनीशक्तीचा प्रवास अनाहतचक्रातून आज्ञाचक्रापर्यंत झाल्यामुळे तिला या चक्रांमध्ये चांगली स्पंदने जाणवून त्यांची शुद्धी झाल्याचे जाणवले.’ – कु. मधुरा भोसले

४ आ. अनुभूती – ‘मला यज्ञकुंडातील धुरात ४ – ५ वेळा ‘ॐ’ दिसले.’ – कु. अपाला औंधकर

४ आ १. अनुभूतीमागील अध्यात्मशास्त्र : ‘शिवाचे ‘दक्षिणामूर्ती’ हे रूप ज्ञानाशी संबंधित आहे. ‘ज्ञानशक्ती’ ही आकाशतत्त्वाशी, म्हणजे निर्गुणाशी संबंधित आहेत. ‘ॐ’ हे निर्गुणवाचक असून ब्रह्मांडातील समस्त ज्ञान ‘ॐ’कारात सामावलेले आहे. ‘दक्षिणामूर्ती’ यागाच्या वेळी यज्ञाच्या ठिकाणी शिवाचे ‘ॐ’कार स्वरूप ज्ञानमय रूपात कार्यरत झाल्यामुळे कु. अपालाला वरील अनुभूती आली.’ – कु. मधुरा भोसले

‘बहुतांश वेळा यज्ञकुंडातील अग्नीचा रंग लाल, केशरी किंवा पिवळा असून तो तेजस्वी असतो; परंतु या वेळी यागातील ज्वाळा पांढरट, पिवळसर आणि सोनेरी रंगाच्या अन् अत्यंत तेजस्वी दिसत होत्या. त्यांच्याकडे २ मिनिटे पाहिले, तरी आध्यात्मिक लाभ होत होते.’ – कु. अपाला औंधकर

४ इ १. अनुभूतीमागील अध्यात्मशास्त्र : अन्य देवतांच्या यज्ञांमध्ये संबंधित देवतांचे सगुण-निर्गुण स्तरावरील तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्यामुळे त्या यज्ञांच्या वेळी यज्ञीय ज्वाळांचा रंग लाल, केशरी किंवा पिवळा असून तो तेजस्वी दिसतो. पिवळा रंग ज्ञान, पांढरा रंग निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य आणि सोनेरी रंग कार्यरत चैतन्य यांचा असतो. यागाच्या वेळी शिवाचे निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य कार्यरत झाले होते. त्यामुळे दक्षिणामूर्ती यागातील यज्ञीय ज्वाळांचा रंग पांढरट, पिवळसर आणि सोनेरी रंगाच्या होत्या. या यज्ञीय ज्वाळांमध्ये शिवाचे ज्ञानतेज सामावले असल्यामुळे त्या अत्यंत तेजस्वी दिसत होत्या. कु. अपालामध्ये सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असल्यामुळे तिने यज्ञीय ज्वाळांतून प्रक्षेपित झालेल्या ज्ञानतेजाच्या सूक्ष्मतम लहरी ग्रहण केल्यामुळे तिला ‘स्वतःला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, अशी अनुभूती आली.’

(क्रमश:)

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.४.२०२३)

दैवी ज्ञानप्राप्तकर्ती आणि सूक्ष्म-परीक्षणकर्ती कु. अपाला औंधकर !

‘कु. अपालाला दक्षिणामूर्ती यागाच्या वेळी मिळालेले अनुभूतीजन्य ज्ञान वाचून मला तिचे कौतुक वाटले. एवढ्या लहान वयात तिच्या बुद्धीची प्रगल्भता हे ज्ञानयोगाचे आणि तिच्या अंतरंगातील भक्तीभाव हे तिच्या भक्तीयोगाचे सूचक असल्याचे जाणवले. ती दैवी ज्ञानप्राप्तकर्ती आणि सूक्ष्म-परीक्षणकर्ती साधिका असल्याचे जाणवले. ‘देवाच्या कृपेने सूक्ष्म ज्ञान आणि परीक्षण करणारी नवीन पिढी सिद्ध होत आहे’, यासाठी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक