Police in Mahakumbh : मद्य आणि मांसाहार करणार्‍या पोलिसांची महाकुंभमध्‍ये नियुक्‍ती करणार नाही !

उत्तरप्रदेश पोलीसदलाचा अभिनंदनीय निर्णय

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मद्यपान आणि मांसाहार करणार्‍या पोलिसांची प्रयागराज महाकुंभमध्‍ये सेवेसाठी नियुक्‍ती करण्‍यात येणार नाही, असा निर्णय पोलीसदलाने घेतला आहे. अतिरिक्‍त पोलीस महासंचालक संजय सिंघर यांनी राज्‍यातील सर्व पोलीस आयुक्‍तालयांना महाकुंभच्‍या काळात प्रयागराज येथे पोलिसांची कुमक पाठवतांना विशेष लक्ष देण्‍यास सांगितले आहे. यासह ‘पोलिसांचे आचरण चांगले असावे, सचोटीने वागावे आणि त्‍यांची प्रतिमा चांगली असावी’, अशी अटही कार्यालयाने यात घातली आहे. (अशी अट का घालावी लागते ? मुळातच पोलीस असे का वागत नाहीत ? – संपादक) पोलीस महासंचालकांच्‍या मुख्‍यालयाने १५ वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍यांना महाकुंभ क्षेत्राची कायदा आणि सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी नियुक्‍त केले आहे.

अतिरिक्‍त पोलीस महासंचालकांनी केलेल्‍या मार्गदर्शक सूचना

१. पोलीस हवालदाराचे वय साधारणपणे ४० वर्षे असावे. तसेच मुख्‍य हवालदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे आणि उपनिरीक्षक आणि निरीक्षक यांचे वय ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

२. मूळ प्रयागराजचा रहिवासी असलेल्‍या अशा कोणत्‍याही पोलीस कर्मचार्‍याला महाकुंभमध्‍ये कर्तव्‍यासाठी पाठवले जाणार नाही. तसेच, तो शारीरिक आणि मानसिकदृष्‍ट्या पूर्णपणे निरोगी, सजग आणि चांगला वागणारा असावा. (असे नसणार्‍यांना पोलीसदलातून काढून का टाकत नाहीत ? – संपादक)