१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगापूर्वी ‘त्यांना काय सांगावे ?’, असा विचार मनात येणे
‘एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) सत्संगाला मी आणि काही साधक उपस्थित रहाणार होतो. तेव्हा माझ्या मनात सत्संगामध्ये ‘मी त्यांना काय विचारू ?’, असा विचार येत होता. माझ्या मनात ‘परम पूज्य सर्व जाणतात आणि त्यांना सांगण्यासारखे माझे काही साधनेचे विशेष प्रयत्नही होत नाहीत, तर मी त्यांच्याशी काय बोलणार ?’, असाही विचार येत होता.
२. भावजागृतीचे वेगवेगळे प्रयोग करत असतांना ‘गुरुदेवांना काहीतरी सांगत आहे’, असे जाणवणे आणि नंतर प्रार्थना सुचणे
नंतर मी भावजागृतीचे वेगवेगळे प्रयोग करण्यास आरंभ केला. भावजागृतीचे प्रयोग करतांना ‘मी गुरुदेवांना सूक्ष्मातून काहीतरी सांगत आहे’, असे मला जाणवत होते. माझ्या मनात ‘मी गुरूंकडे काय याचना करू ?’, असा विचार आला आणि मला पुढील प्रार्थना सुचल्या.
३. साधिकेने केलेल्या भावपूर्ण प्रार्थना !
अ. ‘हे गुरुदेवा, मला कौतुक नको. कृतज्ञता प्रदान करा.’
आ. ‘हे गुरुवर, तुम्ही मला सर्वकाही दिले आहे. तुम्ही मला साधनेसाठी योग्य मार्ग दाखवत आहात. केवळ त्या मार्गदर्शनानुसार कृती करण्यास आणि त्या मार्गावरून पुढे जाण्यास मला शक्ती प्रदान करा.’
इ. ‘हे परमप्रिय गुरुराया, जेव्हा मला तुमचे दर्शन होईल, त्या क्षणी माझ्या मनःपटलावरील प्रत्येक संस्कार विरून जाऊ दे. तुमच्या सत्संगातून बाहेर पडतांना माझा पुनर्जन्म झालेला असू दे.’
ई. ‘हे गुरुराया, माझा नवा जन्म होऊन माझ्या मनातील स्वभावदोष आणि अहं यांच्याशी संबंधित प्रत्येक विचार समूळ नष्ट झालेला असू दे. माझ्या मनाची पाटी कोरी झालेली असू दे.’
उ. ‘हे गुरुमाऊली, माझे मन निर्मळ, सुंदर, पारदर्शक आणि निरागस होऊन आपल्याला प्रिय असे झालेले असू दे’,
अशी आपल्या परम सौख्यदायी चरणी अनंत कोटी वेळा प्रार्थना करते.
४. समष्टीसाठी प्रार्थना करणे
गुरुदेवांच्या सत्संगाला काही साधक उपस्थित होते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘एवढे साधक माझ्या समवेत आहेत, तर मी एकटीसाठी प्रार्थना कशी करू ? तेव्हा सत्संगाला बसलेल्या सर्वांसाठी मी वरील प्रार्थना केल्या.
‘हे गुरुमाऊली, तुम्हीच सर्व सुचवले आहे. ते तुमच्याच चरणी अर्पण करते. आम्ही सर्व साधक तुम्हाला अत्यंत प्रिय आहोतच. त्यामुळे आम्हा सर्वांचीच ही याचना आहे. ती स्वीकार करा गुरुदेवा, स्वीकार करा !’
– कु. योगिता पालन, फोंडा, गोवा.