आपण सतत किती वेगात धावत असतो, याचा विचार केला आहे का कधी ? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सतत पुढे काय करायचे, हाच विचार असतो. हा सततचा वेग, भले कामाचा असेल, विचारांचा किंवा आपल्या गाडीचा सुद्धा मनाला आणि शरिराला त्रासदायक आहे. कुठल्याही पद्धतीची सततची हालचाल शरिरात वात वाढवत नेते. त्यातूनच जर ही सर्व कामे झाली‘च’ पाहिजेत, हा ‘च’सुद्धा या वेगासाठी कारणीभूत असतो. ‘घाई’, मसालेदार पदार्थ सेवन करणे आणि ‘काळजी करणे’, ही ३ आम्लपित्त अन् त्यातून उत्पन्न होणार्या पचनाच्या पुढच्या आजारांची बीज कारणे आहेत. यासाठी काही गोष्टींचा विचार करावा.
१. आपल्या कामाचे प्राधान्य ठरवून काही ठिकाणी प्रथम स्तरावर आणि काही ठिकाणी द्वितीय स्तरावर राहून कामे करावीत.
२. आपण किती काम करतो, शरिराला किती ताण देतो आणि तेवढे करायची खरच आवश्यकता आहे का ? याचे परिणामसुद्धा डोक्यात ठेवणे आवश्यक आहे.
३. खाण्याविषयी हितभूक (शरिराला हितकारक अन्न) आणि मितभूक (जेवण संतुलित असावे अन् ते योग्य प्रमाणात खावे), असे विचार असावेत, म्हणजेच प्रमाणात अन् आपल्याला योग्य अशा पथ्याचे खावे.
४. कामाविषयी जेवढी झेपतील तेवढीच कामे अंगावर घ्या. यासाठी बाकी कुटुंबियांचा तेवढाच हातभार असेल, तर ते अजून सोपे होते.
५. तुमच्या मुलांना लहानपणापासून स्वावलंबी बनवायचा प्रयत्न करा. त्यांची कामे त्यांना करू दे, यामुळे तुमच्यावरील ताण न्यून होईल आणि तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल.
६. ‘सगळी कामे मीच करणार’, हा अट्टहास न्यून करा. त्याने तुम्ही जो अतिरिक्त ताण घेता तो लक्षात येत नाही आणि वय होते, तेव्हा ती कामे सोडवत नाहीत अन् त्याचे शरिरावर, तसेच मानस परिणाम दिसतात.
७. विचार न्यून करण्याच्या दृष्टीने ध्यान, समुपदेशन, अभ्यंग, औषधे यांचे साहाय्य घ्या. बाकी खाण्याचे नियम आणि आयुर्वेदाचा दृष्टीकोन यांचे पालन करून ते अवलंबण्याचा प्रयत्न करावा.
८. कुठलाही अतीयोग, म्हणजे अधिक खाणे, जोरात गाणी ऐकणे, डोळ्याला ताण, जीभेला त्रास होईल असे एकच चवीचे पदार्थ खाणे, अधिक व्यायाम इत्यादी गोष्टी टाळाव्यात. कुठल्याही विषयाचा त्याच्या परिणामानुसार दिनचर्येमध्ये समावेश करावा.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (३.१०.२०२४)