हिंदूंना काँग्रेसच्या ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या धोरणाचा बळी न पडण्याचेही आवाहन
नवी देहली – संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुसलमानांना ‘काँग्रेसची ‘व्होट बँक’ बनू नका’, (व्होट बँक म्हणजे मतपेटी) अशी चेतावणी दिली आहे. काँग्रेसवर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा आणि मुसलमानांना खूश करण्याचा आरोपही रिजिजू यांनी केला. निवडणुकीच्या वेळी काँग्रेस म्हणते, ‘आमचा १५ टक्के मतांचा भाग (मुसलमानांचा भाग) राखीव आहे.’ यातून पक्षाची मानसिकता दिसून येते. हे सर्वज्ञात आहे की, काँग्रेस मुसलमानंना तिची ‘व्होट बँक’ मानते. ‘यामुळे मुसलमानांची पुष्कळ मोठी हानी होत आहे’, असे रिजिजू मुलाखतीत म्हणाले.
रिजिजू यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर या मुलाखतीची एक ‘व्हिडिओ क्लिप’ प्रसारित केली आहे. यासमवेत त्यांनी लिहिले, ‘मुसलमानांना माझा इशारा : काँग्रेसची ‘व्होट बँक’ बनू नका ! हिंदू आणि इतर यांना माझा इशारा : काँग्रेस पक्षाच्या ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या धोरणाचे बळी बनू नका !’
रिजिजू म्हणाले की, राहुल गांधी यांना अनुसूचित जाती, जमाती आणि अन्य मागासवर्गीय लोकांच्या समस्या यांचे ‘एबीसीडी’सुद्धा (काहीच) ठाऊक नाही. तरीही ते सतत यांसंदर्भात बोलत असतात. त्यांना असे बोलायला शिकवले गेले आहे.