Israel Removes Incorrect Indian Map : इस्रायलच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावर भारताचा चुकीचा नकाशा : इस्रायलने मागितली क्षमा !

भारतियांनी ‘एक्‍स’वरून चूक निदर्शनास आणून दिली !

इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अजार

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावर भारताच्‍या नकाशावरील जम्‍मू काश्‍मीरचा बराचसा भाग पाकिस्‍तानमध्‍ये असल्‍याचे दर्शवण्‍यात आले होते. ही गोष्‍ट भारतीय नागरिकांनी ‘एक्‍स’वरून पोस्‍ट करून त्‍याचा जाहीर निषेध केला. त्‍यांनतर इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अजार यांनी यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करत संकेतस्‍थळाच्‍या संपादकाच्‍या चुकीमुळे असे झाल्‍याचे स्‍पष्‍ट केले. तसेच ‘आम्‍ही तो नकाशा संकेतस्‍थळावरून लगेच हटवला आहे. ही गोष्‍ट आमच्‍या निदर्शनास आणून दिल्‍याबद्दल धन्‍यवाद’, असेही ते म्‍हणाले.

एका भारतीय नागरिकाने ‘एक्‍स’द्वारे नकाशाचे छायाचित्र प्रसिद्ध करून त्‍यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली होती. त्‍याने म्‍हटले होते की, इस्रायलच्‍या हमास, हिजबुल्ला, तसेच इराण यांच्‍यासमवेत चालू असलेल्‍या संघर्षात भारत इस्रायलबरोबर उभा आहे. असे असले, तरी इस्रायल भारताबरोबर आहे का ? इस्रायलच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावरील भारताचा हा नकाशा पहा. यामध्‍ये जम्‍म-काश्‍मीरकडे पहा. हा विषय सर्वत्र पसरला. भारतियांनी त्‍याला मोठ्या प्रमाणात विरोधही केला. ही गोष्‍ट इस्रायलच्‍या लक्षात येताच, त्‍याने त्‍यावर क्षमायाचना करून चुकीचा नकाशा संकेतस्‍थळावरून त्‍वरित हटवला.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे सतर्क आणि तत्‍पर रहाणार्‍या राष्‍ट्रप्रेमी भारतियांचे अभिनंदन !