Donald Trump Advice Israel : इस्रायलने सर्वांत आधी इराणच्‍या अणू प्रकल्‍पांवर आक्रमण करावे ! – ट्रम्‍प

बायडेन यांच्‍या भूमिकेच्‍या विरुद्ध मांडली भूमिका !

डोनाल्‍ड ट्रम्‍प

राली (अमेरिका) – अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष आणि रिपब्‍लिकन पक्षाचे यंदाचे राष्‍ट्राध्‍यक्षपदाचे उमेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी इस्रायल-इराण युद्धासंदर्भात महत्त्वपूर्ण वक्‍तव्‍य केल्‍याने भीषण युद्धाची शक्‍यता वाढली आहे. ट्रम्‍प म्‍हणाले की, इस्रायल आणि इराण यांच्‍यातील तणाव वाढला असून इस्रायलने सर्वांत आधी इराणच्‍या अणू प्रकल्‍पांवर आक्रमण केले पाहिजे. ते नॉर्थ कॅरोलिना येथे एका प्रचारसभेला संबोधित करत होते.

१. विद्यमान राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांनी यासंदर्भात एका पत्रकार परिषदेद्वारे २ दिवसांपूर्वीच मध्‍य आशियातील सर्व देशांना युद्धातून बाहेर पडण्‍याची सूचना केली होती. इस्रायल-इराण संघर्ष थांबवून मध्‍य आशियातील तणाव अल्‍प करण्‍यावर त्‍यांनी भर दिला होता.

२. पत्रकारांनी बायडेन यांना विचारले होते की, जर इस्रायलच्‍या जागी तुम्‍ही असता, तर काय केले असते ? यावर बायडेन म्‍हणाले की, माझ्‍या माहितीप्रमाणे ते (इस्रायल) अणू प्रकल्‍पांवर तरी आक्रमणे करणार नाहीत.

३. ट्रम्‍प यांनी त्‍यांच्‍या भाषणात या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत म्‍हटले की, अणू प्रकल्‍पांवर तर सर्वांत आधी आक्रमणे झाली पाहिजेत ना ? तुम्‍हाला सर्वांत आधी अण्‍वस्‍त्रांवर आक्रमणे चढवावी लागतील; कारण अण्‍वस्‍त्र हीच सर्वांत मोठी चिंता आहे. जो बायडेन यांनी इस्रायलला सांगायला हवे होते की, तुम्‍ही इराणच्‍या अणू प्रकल्‍पांवर आक्रमण करा. नंतरचे नंतर बघून घेऊ. जर इस्रायलला आक्रमण करायचे असेल, तर तो नक्‍कीच करील; पण त्‍याच्‍या काय योजना आहेत, यावर आपले लक्ष असायला हवे.