‘२६.९.२०२२ ते ५.१०.२०२२ या नवरात्रोत्सवाच्या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नऊ दिवस देवी होम करण्यात आले. २७.९.२०२२ या दिवशी झालेल्या देवी होमाच्या वेळी मला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. साधिकेच्या कार्यालयातील बैठक रहित झाल्याने होमाच्या ठिकाणी वेळेवर पोचता येणे
यज्ञाच्या दिवशी माझ्या कार्यालयात एक बैठक होती. त्यामुळे मी देवीला शरण जाऊन प्रार्थना केली, ‘माते, तू मला बोलावले आहेस. आता तूच मला आश्रमात ने. मला काही सुचत नाही. मला साहाय्य कर, जगदंबे !’ मी प्रार्थना केल्यानंतर कार्यालयातील ती बैठक रहित झाल्याचे मला समजले. त्यामुळे मी आश्रमात वेळेवर पोचू शकले. आश्रमात पोचताक्षणी माझ्या मनात पुष्कळ कृतज्ञता दाटून आली.
२. होमाच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची दृष्टी साधिकेवर पडताच तिला अत्यानंद होणे
होमाच्या स्थळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे आगमन झाले. त्या दोघींनी आम्हा सर्वांना बसायला सांगितले आणि सर्वांची प्रेमाने विचारपूस केली. त्यांची दृष्टी माझ्यावर पडताच मला अत्यानंद झाला. ‘हा सोनेरी क्षण माझ्या जीवनात असेल’, याची मी कधी कल्पनाच केली नव्हती.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींना पाहून भावजागृती होणे
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ मोकळेपणाने साधकांशी बोलत होत्या. एवढा सुंदर संवाद माझ्या कानांवर पडल्याने मला पुष्कळ धन्य झाल्यासारखे वाटत होते. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. माझे ‘अहोभाग्य’ म्हणून मला देवींची प्रीतीही अगदी जवळून अनुभवता आली.
४. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी प्रेमाने जवळ घेणे आणि तो क्षण आठवल्यावर आनंदाने भरून येणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी मला प्रेमाने जवळ घेतले. तो क्षण अजूनही आठवला की, मला अत्यंत उत्साह वाटतो आणि माझे मन आनंदाने भरून येते. मला इतके प्रेम कधीच अनुभवायला मिळाले नव्हते. अनेक साधक आपले अनुभव सांगत होते. मी केवळ ‘गुरुचरणी कृतज्ञता !’ हाच ‘जप’ करत होते.
५. या अनुभूतीनंतर मला ‘देवी सदैव माझ्या समवेत आहे’, असे वाटले.
भगवंताने मला एक अभूतपूर्व अनुभूती दिली. ‘ऐन नवरात्रीत देवीने सगुण रूपात दर्शन देऊन प्रीतीचा वर्षाव करणे’, हा माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण होता. त्यासाठी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’ (ऑक्टोबर २०२२)
– सौ. गौरी प्रभास नायक, ढवळी, फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |