ट्रेंटन (न्यू जर्सी, अमेरिका) येथील आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रमात पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्याशी वार्तालाप आणि अमेरिकेतील हिंदूंना मार्गदर्शन

ट्रेंटन (न्यू जर्सी, अमेरिका) येथील आकाशवाणी केंद्रावर प्रत्येक रविवारी एक घंटा ‘विश्वगीत-माला’ हा भारतीय कार्यक्रम होत असे. रविवार, २८.९.१९८० या दिवशी सकाळी ९ ते १० या वेळात प्रा. शेवडे यांच्याशी श्रीमती यंदे यांनी वार्तालाप साधला. त्या वेळची प्रश्नोत्तरे पुढे दिली आहेत.

परमेश्वरावर प्रेम हीच भक्ती !

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

श्रीमती यंदे : आम्ही इकडच्या मंडळींनी ईश्वरकृपा प्राप्तीसाठी काय करावे ?

प्रा. सु.ग. शेवडे : प्रश्न छान आहे.

आपण आपल्या देशापासून फार दूर आलो आहोत, तरी परमेश्वर सर्व विश्वभर भरलेला आहे. त्याची कृपा प्राप्त होण्यासाठी भक्ती हाच उत्तम मार्ग आहे. नामस्मरण, स्तोत्रपठणादी आणि नित्य ईश्वर स्मरणाने भक्ती साधता येते; परंतु ‘आपले प्रत्येक कर्म करतांना ‘ते ईश्वराला प्रिय होईल का ?’ हा विचार नित्य मनात ठेवणे’, ही खरी भक्ती होय. हेच अनुसंधान मनात असायला हवे. परमेश्वरावर प्रेम हीच भक्ती ! ते प्रेम कृतीत आणणे म्हणजे ईश्वराला प्रिय तेच कार्य करणे. परमेश्वराला प्रिय काय आणि काय नाही, हे कसे समजायचे ? असा एक प्रश्न विचारता; पण याचे उत्तरही सोपे आहे. आपले मनच चांगल्या-वाईटाची ग्वाही देत असते. तसेच शास्त्र मार्गदर्शनासाठी सिद्धच आहे. त्या शास्त्रानुसार कर्म करावे.

शास्त्र म्हणेल जें सांडावें । तें राज्यही तृण मानावें ।
जें घेववी तें न म्हणावें । विषही विरु ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १६, ओवी ४६०

अर्थ : शास्त्र जे टाकावे म्हणून म्हणेल, ते जरी राज्य असले, तरी ते गवताच्या काडीप्रमाणे समजावे आणि शास्त्र जे घ्यावे म्हणून सांगेल, ते जरी विष असले, तरी प्रतिकूल समजू नये.

भगवंताचे केवळ नामस्मरण करणे म्हणजे भक्ती नव्हे. ते नामस्मरण करणारे मन शुद्ध हवे. मुख पवित्र हवे. अपवित्र बोलणारे नको. अंतःशुद्धी फार महत्त्वाची आहे. त्यासाठी मग नामस्मरण, असे शुद्ध जीवन जगणे म्हणजेच भक्ती. या भक्तीने परमेश्वराला आपण निश्चितच प्रिय होऊ. ती भक्ती इथेही होऊ शकते.

सनातन वैदिक धर्म, भारतीय जीवनधारणा, आत्मकल्याणाचा आध्यात्मिक मार्ग परदेशातही स्वधर्मरक्षण आणि स्वत्वाची अस्मिता इत्यादींच्या संदर्भात माझ्या धर्मबांधवातील मरगळ दूर व्हावी, त्यांना त्या दृष्टीने चैतन्य प्राप्त व्हावे, याविषयी जागृत करण्यासाठी मी आलो आहे.

या शहरात हिंदु लोक पुष्कळ आहेत आणि त्यांना हे मार्गदर्शन निश्चित आवडेल, अशी मला माहिती मिळाली; म्हणून मी ४ दिवस आपल्या गावाला दिले. माझा आपण उपयोग करून घ्या. आपण करून घेतला नाहीत, तरी मी इथे ४ दिवस रहाणार आहे. भेटतील त्यांच्याजवळ माझे विचार बोलणार आहे. नाहीतर खुशाल आराम करीन ! माझे काय बिघडणार आहे ? गूळ गोड असला, तरी त्याची चव सगळ्यांनाच कुठे ठाऊक असते; पण त्यामुळे गुळाची गोडी थोडीच अल्प होते ?

येथे सात समुद्रापलीकडे येऊनही भारतीय बांधव संस्था, मंडळे, नियतकालिके, मंदिरे उभारत आहेत. काही स्वतःचे व्यवसाय उभे करत आहेत. आपल्या लोकांचे हे उद्योग पाहून मनाला बरे वाटत आहे. ही आपली चाल आपणच अमेरिकेन न बनता ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ (ऋग्वेद, मण्डल ९, सूक्त ६३, ऋचा ५), म्हणजे ‘संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू.’ या सिद्धांताच्या दिशेने असावी म्हणजे झाले. त्यासाठी किमान कार्यक्रम पुढीलप्रमाणे सुचवावासा वाटतो.

१. आपल्या घरात प्रवेश करताच हे ‘हिंदु घर’ आहे, असे जाणवले पाहिजे. त्यासाठी श्रीकृष्ण, श्रीराम, श्री गणेश, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदासस्वामी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांपैकी एखाद्याचे चित्र दर्शनी भागात हवे.

२. आपल्या मुलांसह घरात आपली भाषा बोलली जायला हवी. भाषा हे संस्कृतीचे माध्यम आहे. मुलांच्या नावांची रूपे सॅम, पॅट, मून, अशा परकीय पद्धतीची करू नये.

३. ‘आपला देश किती महान आहे’, हे मुलांना पटवावे. आपल्या देशांत गरिबी आणि अज्ञान आहे, हे खरे; पण दिव्य इतिहास, महान परंपरा, अपूर्व त्याग, अतुलनीय कला, नैसर्गिक सौंदर्य, असामान्य साहित्य इत्यादी पुष्कळ सांगण्यासारखे आहे. ते मुलांपुढे ठेवावे.

४. मुलांना मधून मधून भारतात पाठवून केवळ नातेवाइकांकडेच न ठेवता महान ऐतिहासिक आणि धार्मिक स्थाने दाखवावीत.

५. घरात नित्य देवापुढे प्रार्थना म्हणावी. सणवार स्मरणपूर्वक साजरे करावेत.

६. आपले हिंदू बांधव परधर्मात जात असल्याबद्दल बर्‍याच मंडळींनी चिंता व्यक्त केली होती. आपली मुले हिंदु रहातील, यासाठी कष्टपूर्वक मार्गदर्शन करावे.

मित्रहो, मी जे पाहिले, त्याने माझ्या एका डोळ्यात आनंदाश्रू आले; पण दुसरा डोळा मात्र दुःखाश्रू ढाळतो आहे. आपल्या देशातील उत्तम कर्तबगार मंडळी इथे आली, त्यांचा वंश हिंदु रहावा. त्याला हिंदुत्वाचा अभिमान असावा, यासाठी माझा जीव तुटतो आहे; म्हणून मी हे लिहिले. आपली मुले हिंदु संस्कारांना वंचित होत आहेत, हे मी बहुसंख्य ठिकाणी पाहिले; म्हणून हा प्रपंच. हे लिहिल्याबद्दल माझ्यावर रागावू नका; पण हे सांगण्यात माझा काही स्वार्थ नाही. याचा उपयोग करतील, त्यांना उतारवयात नसत्या विवंचना उभ्या रहाणार नाहीत.’

(समाप्त)

– शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (२८.९.१९८०)