ट्रेंटन (न्यू जर्सी, अमेरिका) येथील आकाशवाणी केंद्रावर पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्याशी वार्तालाप आणि अमेरिकेतील हिंदूंना मार्गदर्शन

ट्रेंटन (न्यू जर्सी, अमेरिका) येथील आकाशवाणी केंद्रावर प्रत्येक रविवारी एक घंटा ‘विश्वगीत-माला’ हा भारतीय कार्यक्रम होत असे. रविवार, २८.९.१९८० या दिवशी सकाळी ९ ते १० या वेळात प्रा. शेवडे यांच्याशी श्रीमती यंदे यांनी वार्तालाप साधला. त्या वेळची प्रश्नोत्तरे पुढे दिली आहेत.

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

श्रीमती यंदे : शेवडेजी, आपण कोणत्या उद्देशाने अमेरिकेत आला आहात ?

पू. प्रा. सु.ग. शेवडे : विश्व हिंदु परिषदेच्या वतीने ‘बॅटनरूज’मध्ये झालेल्या हिंदु परिषदेमध्ये उपस्थित रहाण्यासाठी मी कीर्तन महाविद्यालय, पुणे या संस्थेकडून अमेरिकेत आलो. आमच्या कीर्तन महाविद्यालयाच्या ‘जगाच्या वेशीवर ज्ञानबा-तुकाराम’ या योजनेनुसार अमेरिकेत धर्मप्रसार करण्यासाठी माझी निवड झाली.

श्रीमती यंदे : ही योजना काय आहे ?

पू. प्रा. सु.ग. शेवडे : परदेशात जी भारतीय मंडळी आली आहेत, त्यांना भेटून आणि एकत्र करून त्यांच्यासमोर ‘कीर्तन-प्रवचनादी माध्यमातून भारतीय संस्कृती, सभ्यता, हिंदु धर्म, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांचा ऊहापोह करायचा. भारतियांना त्यांच्या निष्ठांविषयी जागृत ठेवायचे’, हा या योजनेचा उद्देश आहे. त्या दृष्टीने जगातील सर्व देशांत कीर्तनकार आणि प्रवचनकार यांना पाठवण्याचे ठरले आहे. मी त्यापैकी पहिला प्रवचनकार म्हणून अमेरिकेत आलो.

श्रीमती यंदे : इथल्या मंडळींनी आपणास कसे सहकार्य केले ?

पू. प्रा. सु.ग. शेवडे : फारच उत्तम प्रकारे सहकार्य केले. मी अमेरिकेत आलो, तेव्हा माझ्याजवळ संपर्कासाठी १० जणांचेसुद्धा पत्ते नव्हते आणि ते पुष्कळ दूरदूर रहाणारे होते, उदा. एक फ्लोरिडाचा, तर दुसरा लॉस एंजलिसचा ! बॅटनरूजला आल्यावर जी मंडळी भेटली, त्यांच्या सहकार्याने आणि पुढे भेटणार्‍या सर्वांच्या सहकार्यानेच माझा हा दौरा झाला. तेव्हा अमेरिकेत मला ओळखणारी मंडळी ७-८ सुद्धा नसतील; पण आता सुमारे ५ सहस्र आहेत. माझे इकडे सर्व कार्यक्रम इकडच्या मंडळींच्या सहकार्यानेच झाले, तसेच हे लोकच माझ्या नेण्या- आणण्याची व्यवस्था करत असत.

श्रीमती यंदे : आपणास इतके सहकार्य कसे काय मिळाले ?

पू. प्रा. सु.ग. शेवडे : आम्ही लोकांना देतो, ते त्यांना आवडत आहे. भारतातून इकडे कलावंत येतात; पण ते प्रामुख्याने अर्थार्जनासाठी येतात. धर्माचे किंवा आत्मकल्याणाचे मार्गदर्शन करणारे थोडेच असतात. जे येतात, ते महाराज, स्वामी आणि आता तर भगवान् ! अशा या मंडळींचा दृष्टीकोनसुद्धा प्रामुख्याने शिष्य परिवार जमवून ‘आत्म’कल्याण साधण्याचाच अधिक असतो. अशा परिस्थितीत सांप्रदायातीत विशुद्ध धर्म मार्ग आणि सांस्कृतिक दर्शन घडवण्याचा आमचा हेतू लोकांना आवडला. काहींनी तर विमानाची तिकिटेही काढून दिली. ते म्हणत, ‘‘शेवडेजी, तुम्ही आमच्यासाठी आला आहात. तुमचा प्रवास उत्तम आणि सुखावह होणे, हे आमचे   कर्तव्यच आहे.’’

श्रीमती यंदे : तुम्हाला इथल्या भारतियांचे जीवन कसे वाटले ?

पू. प्रा. सु.ग. शेवडे : मी इथे अनेक लोकांकडे राहिलो. त्यांच्या घरात ऐश्वर्य आहे. कुणाला काही अल्प नाही; पण जाणवते की, इथे आल्यावर, मी कोण आहे ? माझा धर्म काय ? माझी संस्कृती काय ? भाषा कोणती ? परंपरा कोणती ? आम्ही येथे का आलो ? उपजीविकेसाठी आलो, हे ठीक आहे; पण मला सांगायला दुःख वाटते की, बरेच लोक आपल्या महान धर्म-संस्कृतीला विसरायला लागले आहेत. एक साधी गोष्ट पहा. आपण हिंदु आहोत. हिंदू गायीला देवता मानतात. गोमांस खात नाहीत; पण इथ पहातो, तर काही मंडळी कौतुकाने आपल्या मुलांना ‘हॅमबर्गर’ खाऊ घालत आहेत. काही स्वतःही खातात. ‘हे आपल्या संस्कृतीत बसणारे नाही’, असेही त्यांना वाटत नाही. आम्ही यावर बोललो, तर काही मंडळी म्हणाली, ‘‘आम्ही हिंदुस्थानात गेलो की, खात नाही.’’ आपण कुठेही गेलो, तरी आपली संस्कृती टिकवली पाहिजे. आपली जीवनमूल्ये जपली पाहिजेत. रामायणामध्ये प्रभु श्रीराम म्हणतात,

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।।

अर्थ : लक्ष्मणा, लंका सोन्याची जरी असली, तरी मला तिच्याविषयी प्रेम नाही. आई आणि जन्मभूमी मला स्वर्गाहूनही थोर वाटतात.

प्रभु श्रीरामाचे हे उत्तर लक्षात ठेवायला हवे.

परमेश्वरावर प्रेम हीच भक्ती !

श्रीमती यंदे : ठीक आहे. मग आम्ही इकडच्या मंडळींनी ईश्वरकृपा प्राप्तीसाठी काय करावे ?

पू. प्रा. सु.ग. शेवडे : प्रश्न छान आहे.

आपण आपल्या देशापासून फार दूर आलो आहोत, तरी परमेश्वर सर्व विश्वभर भरलेला आहे. त्याची कृपा प्राप्त होण्यासाठी भक्ती हाच उत्तम मार्ग आहे. नामस्मरण, स्तोत्रपठणादी आणि नित्य ईश्वर स्मरणाने भक्ती साधता येते; परंतु ‘आपले प्रत्येक कर्म करतांना ‘ते ईश्वराला प्रिय होईल का ?’, हा विचार नित्य मनात ठेवणे’, ही खरी भक्ती होय. हेच अनुसंधान मनात असायला हवे. परमेश्वरावर प्रेम हीच भक्ती ! ते प्रेम कृतीत आणणे म्हणजे ईश्वराला प्रिय तेच कार्य करणे. परमेश्वराला प्रिय काय आणि काय नाही, हे कसे समजायचे ? असा एक प्रश्न विचारता; पण याचे उत्तरही सोपे आहे. आपले मनच चांगल्या-वाईटाची ग्वाही देत असते. तसेच शास्त्र  मार्गदर्शनासाठी सिद्धच आहे. त्या शास्त्रानुसार कर्म करावे.                 (क्रमशः)

(साभार : पू, शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (२८.९.१९८०))