Garba event cancelled : मुसलमान आयोजक असणारा इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील गरबा कार्यक्रम बजरंग दलाच्‍या विरोधामुळे रहित

गरब्‍याचा ‘लव्‍ह जिहाद’साठी वापर होत असल्‍याचा केला होता आरोप

इंदूर (मध्‍यप्रदेश) – येथील भवरकुवा परिसरात गेल्‍या ३५ वर्षांपासून नवरात्रोत्‍सवाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे आयोजक फिरोज खान यांच्‍यावर लव्‍ह जिहादचा प्रचार केल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. या कार्यक्रमाचा वापर हिंदु महिला आणि मुसलमान पुरुष यांच्‍यातील संबंध वाढवण्‍यासाठी केला जातो, असा आरोप स्‍थानिक बजरंग दलाने केला आहे. यासंदर्भात त्‍यांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे. यामुळे या गरबा कार्यक्रमाचे आयोजनच रहित करण्‍यात आले आहे.

१. बजरंग दलाचे नेते तन्‍नू शर्मा म्‍हणाले की, आम्‍ही या आयोजकावर यापूर्वी कारवाई करू शकत नव्‍हतो. यावर्षी आम्‍हाला वेळेत माहिती मिळाली आणि त्‍याला कार्यक्रम रहित करण्‍यास भाग पाडले. आम्‍ही स्‍थानिक पोलिसांकडे तक्रारही केली आहे,

२. कार्यक्रमाचे आयोजक खान यांनी म्‍हटले की, गेल्‍या ३५ वर्षांपासून येथे नवरात्रोत्‍सव साजरा केला जातो. मी २५ वर्षांपासून या कार्यक्रमाच्‍या कामासाठी गुंतलो आहे आणि गेल्‍या १५ वर्षांपासून मी स्‍वतः या कार्यक्रमाचे नियोजन करत आहे. आम्‍हाला यापूर्वी कधीही अशा समस्‍येचा सामना करावा लागला नाही.

३. इंदूरचे पोलीस अधीक्षक ऋषिकेश मीना यांनी सांगितले की, पोलिसांचा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही. आम्‍ही कुणालाही अनुमती दिलेली नाही किंवा आम्‍ही कोणत्‍याही कार्यक्रम आयोजकांना त्‍यांचा कार्यक्रम रहित करण्‍यास भाग पाडलेले नाही. स्‍थानिक पक्षांमधील वादामुळे ही घटना घडली.