भिवंडी येथे नवरात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस सतर्क !

ठाणे, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – भिवंडी येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली होती. यानंतर तिथे तणाव निर्माण झाला होता. नवरात्रोत्सवात या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी भिवंडी येथील शहरी आणि ग्रामीण कडक बंदोबस्त तैनात केला आहे. भिवंडीत येथे राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
प्रतिदिन पोलीस भिवंडी शहरात पहारा देत आहेत. ‘रूट मार्च’ (विशिष्ट पद्धतीचे केलेले संचलन) काढण्यात येत आहेत. सलोखा राखण्यासाठी संवेदनशील ठिकाणी, मोहल्ले, नवरात्रोत्सव मंडळे येथे पोलिसांकडून बैठका घेतल्या जात आहे. शांतता समितीच्या माध्यमातून पोलीस नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. समाजमाध्यमांवर अफवा पसरणार नाही, याकडेही पोलिसांचे लक्ष आहे. समाजमाध्यमांवरून धार्मिक तेढ निर्माण होईल, असे लिखाण प्रसारित करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याची चेतावणी पोलिसांनी दिली आहे. संपूर्ण आयुक्तालयाच्या क्षेत्रावर ६ सहस्र अधिकारी आणि कर्मचारी यांचा फौजफाटा तैनात असणार आहे. चोरी, तसेच अपप्रकार टाळण्यासाठी गरब्याच्या कार्यक्रमांत महिला आणि पुरुष पोलिसांचे पथक साध्या वेशामध्ये तैनात असेल.