ज्येष्ठांचा आहार

‘साधारणपणे आपल्या घरात वयस्कर व्यक्ती असल्या, तर त्यांना खायला काय द्यायचे ?’, हा प्रश्न बर्‍याचदा असतो. त्यातून त्यांचे वय, त्यांचा आजार आणि घरात लहान मुले असतील, तर २-३ प्रकारचे पदार्थ डोक्यात ठेवून, तसेच काम सांभाळून स्वयंपाक ठरवायला लागतो. त्यासाठी काही सोप्या गोष्टी आणि नियम लक्षात घेतले, तर रुचकर खाणे पटकन बनवता येते. यामध्ये आरोग्य, वय आणि व्यावहारिक अडचणी यांचा विचार करून काही गोष्टी येथे देत आहे.

१. साधारणपणे वय ६० ते ७० वर्षे, ७० ते ८० वर्षे आणि ८० वर्षांच्यावर अशा ३ गटांमध्ये वयस्कर व्यक्तींना विभागता येईल. वय ६० ते ७० वर्षे असतांना दात त्यामानाने असतात आणि पचन ठीक असते. वय ७० ते ८० यामध्ये प्रमेह किंवा मूत्रपिंड तक्रारी चालू होतात. त्याचा आहार वेगळ्या पद्धतीत विचारात घेतला जातो. वय ८० वर्षांच्या पुढे कवळी आणि पचन या दोन्ही गोष्टी विचारात घ्यायला लागतात. वयस्कर माणसांना पटकन ठसका लागणे, चावायचा कंटाळा येणे, भाजी न शिजल्याने न पचणे हे त्रास होतात. या काळजी घेऊन त्यांचे खाणे बनवावे लागते.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

२. काही लोकांमध्ये संध्याकाळी भूक न्यून लागणे, तसेच काही पदार्थ पचायच्या तक्रारी चालू होऊ शकतात. यामध्ये साधारणपणे कोबी, हिरवी मिरची, ढोबळी, हरभरा पीठ सामान्यतः दिसतात. सध्याच्या वातावरणात होत असलेले पालट आणि दिनचर्या यांच्यातील पालट बघता हिरवी मिरची तर आवर्जून सगळ्यांनीच टाळायला हरकत नाही. वयानुसार ती पूर्ण बंद करायला हवी. मसाले म्हणून आले, लसूण, काळी मिरी, कोथिंबीर याचा उत्तम स्वाद येतो.

३. याच वयात बर्‍याचदा कंटाळा म्हणून किंवा सगळे पोषण एकत्र जाईल, अशा गैरसमजातून स्वतःहूनच सकाळी २ चमचे ‘प्रोटीन’ (प्रथिने) पावडर आणि दूध असे घ्यायचा प्रघात चालू होतो; परंतु अतिरिक्त प्रथिने वयाप्रमाणे न्यून झालेल्या शारीरिक कष्टाला ना आवश्यक असते ना उपयुक्त. उलट मूत्रपिंड, यकृत यांवरील अतिरिक्त ताण वाढवणारे असल्याने ते टाळावे.

४. सकाळी बर्‍याच लोकांना भूक लागत नाही किंवा सकाळी ११ वाजण्याच्या आसपास भूक लागते. सकाळी ११ अथवा ११.३० वाजता जेवून घेणे, हा उत्तम पर्याय यामध्ये रहातो. संध्याकाळीही ६ किंवा ६.३० वाजता भूक लागल्यावर जेवण करणे चांगले.

५. दुपारच्या जेवणात पोळी-भाजी/भाकरी-भाजी असे जेवण करायला हरकत नाही. पोळी आणि भात एकच जेवणात खाण्यापेक्षा एका खाण्यात एक धान्य खाल्ले, तर ते करायलाही सोपे जाते आणि पचायला जड होत नाही. ज्यांना सकाळी न्याहरीच्या वेळी कडकडून भूक लागत असेल, त्यांनी सकाळी वरण-भात आणि दुपारी पोळी/भाकरी-भाजी, असे खाल्ले, तर ते करण्याच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सोपे जाते. न्याहरी करत नसाल, तर एक वेळी पोळी-भाजी आणि एक वेळ वरण-भात किंवा भाताचा प्रकार, असे जेवण करता येते.

६. संध्याकाळी पराठा, ज्वारी आणि मिश्र पिठाचा धपाटा, एखादे सूप अन् वाटीभर उपमा करता येईल. बाहेरचा रवा न वापरता घरी काढलेला तांदूळ किंवा गहू रवा याचा उपमा अधिक चांगला राहील. वय आणखी अधिक आणि दाताच्या समस्या असतील, तर तांदूळ घावन, उकड, नाचणी आंबील, खिचडी असे देता येईल. मधुमेह नसेल, तर गूळ घालून गव्हाचा शिरा; वय बरेच असेल आणि भूक अल्प असेल, तर पौष्टिक लाडू अन् दूध असेही देता येते. रात्री अगदी अल्प भूक असल्यास लाह्या, दूध, साखर किंवा राजगिरा लाह्या तूपावर परतून किंचित् ओला नारळ घालून देता येते.

७. भाज्यांमध्ये प्रामुख्याने फळभाज्या द्याव्यात. उसळी द्यायच्या असल्यास पूर्ण शिजवून लसूण घालून लिंबू पिळून द्याव्यात. नाचणी, बाजरी हे रुक्ष आणि वातकर असल्याने अल्प द्यावे. बाजरी द्यायची झाल्यास खजूर आणि गूळ घालून तूपावर भाजून त्याचे खमंग रोट करून देता येईल.

८. वयस्कर माणसांचा आहार हा स्निग्धच हवा. यासाठी तूप, साय, दूध, लोणी हे पदार्थ आहारात असावेत. प्रकृती बारीक, काटक आणि भूक चांगली असल्यास साय अन् खडीसाखर देता येते. सलॅड (कोशिंबीर), ‘स्मूदी’ (द्रवरूप पदार्थ), पुष्कळ सारे कच्चे पदार्थ देऊ नयेत. वारंवार कफाचा त्रास असल्यास किंवा बर्‍यापैकी अंथरुणावर झोपून असलेले रुग्णाईत रुग्ण असता ताक, दही, फळे हे पदार्थ टाळावेत. दुपारच्या जेवणात मूगाचे किंवा ज्वारीचे पीठ लावून ताकात केलेली पालेभाजी देता येईल. नुसते दही, ताक टाळावे.

९. दात नसतांना किंवा नीट चावता येत नसेल, तर ज्वारी, तांदूळ भाकरीची उकड काढून त्याच्या छोट्या भाकर्‍या करता येतात. कोशिंबीर पुष्कळ आवडत असल्यास छोट्या किसणीवर काकडी, गाजर, बीट किसून करता येते. त्यामध्ये लिंबू, डाळिंब दाणे, तसेच तूप जिर्‍याची फोडणी अवश्य घालावी. वयस्कर माणसांना लोणचे न देता ओल्या नारळाची किंवा आले आणि पुदिना यांची चटणी दिल्यास त्यांची चव वाढवते. तोंडी लावायला मोरावळासुद्धा वापरता येतो.

१०. ज्यांची मुले दूर किंवा दुसरीकडे रहात असतील, तर त्याचाही एक मानसिक ताण असतो. भूक आपोआप न्यून होते. अशा वेळी त्यांचे जे ‘केअर टेकर’ (काळजी घेणार्‍या व्यक्ती) असतात, आजूबाजूची माणसे असतात यांचा हातभार पुष्कळ मोठा असतो. दूर असाल, तर एखादा भ्रमणभाष करून; शेजारी किंवा जवळ असाल, तर डोकावून ‘काय आजोबा काय म्हणत आहात ?’ किंवा ‘आजी घरी सूप केले होते; म्हणून आणून दिले चवीला…’, असे एखादे वाक्य त्यांचे नैतिक बळ वाढवते. घरातच ज्येष्ठ व्यक्ती असतील, तर दिवसातील ५-१० मिनिटे त्यांच्याजवळ बसून बोलले, तर त्यांना पुष्कळ बरे वाटते. एक समाज म्हणूनही आता या घटकाकडे विशेष लक्ष देणे, हे आपले कर्तव्य आहे. अशा आपल्या छोट्याशा कृतीने त्यांचे जेवण छान झाले, तर आपल्यालाही बरे वाटेल, यात काही शंका नाही.’ (३०.९.२०२४)

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.