२१.७.२०२४ या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या ९० व्या व्यष्टी संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी स्फुरलेले भक्तीगीत आणि इतर सूत्रे येथे देत आहोत.
गुरुदेवा, आपल्या चरणी कोटीश: साष्टांग प्रणाम !
१. अवर्णनीय अशी गुरुदेवांची महती !
‘गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले), ‘तुमची महती कोणत्या शब्दांत वर्णावी !’, याचे कोडेच आहे. श्रुति आणि स्मृति सुद्धा देवाचे गुणवर्णन करू शकल्या नाहीत, त्याचप्रमाणे माझ्या गुरुदेवांचे वर्णन करायला माझे शब्द अपुरेच पडतील !’
२. गुरुचरणांची सेवा नराला नारायण बनवी ।
देवा, मला एक भक्तीगीत आठवले. त्यातून ‘गुरुचरणांची सेवा कशी करावी आणि त्याचे शिष्याला कोणत्या रूपात फळ मिळते’, हे लक्षात येते. यांतून ‘सर्व साधकांना शिकायला मिळेल’, यासाठी तुमच्या चरणी हे भक्तीगीत अर्पण करणे योग्य आहे’, असे मला वाटले.
गुरुचरणांची सेवा करावी । नराते नारायण बनवी ।। धृ. ।।
मन रमवावे श्री गुरुचरणी । उच्चारावी श्री गुरुवाणी ।।
ध्यास घ्यावा गुरु नामाते । ऐसी भक्ती नित्य करावी ।। १ ।।
देहात दिसे श्री गुरुआत्मा । त्यांनी व्यापिला अंतरात्मा ।।
द्वैताची संपली परी सेवा । अद्वैताची हीच भैरवी ।। २ ।।
श्री समर्थ (टीप १) समाधिस्त झाले । कल्याणाला (टीप २) दुःख जाहले ।।
समाधी भंगून दर्शन दिधले । गुरु-शिष्यांची अशी थोरवी ।। ३ ।।
गुरुआज्ञेचे पालन करणे । ध्यानी-मनी श्री गुरु चिंतणे ।।
अपुले सारे अर्पण करणे । अनुभवाची साक्ष घ्यावी ।। ४ ।।
टीप १- श्री समर्थ : श्री समर्थ रामदासस्वामी
टीप २ – कल्याण : श्री समर्थ रामदासस्वामींचे शिष्य
३. साधकांनी करायचे प्रयत्न
गुरुदेवा, ‘तुम्हाला केवळ चरणसेवा (गुरुकार्य करणे) अपेक्षित नाही, तर ‘सर्व साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून अंतर्बाह्य शुद्धता निर्माण करणे, तसेच व्यष्टी आणि समष्टी साधना करणे’, अपेक्षित आहे.
४. हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी गुरुदेव घेत असलेले परिश्रम आणि महर्षींनी जगाला करून दिलेली गुरुदेवांची ओळख !
तुम्ही हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अखंड परिश्रम करत आहात. तुम्ही अनंत त्रास सहन केले. वाईट शक्तींनी तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर पुष्कळ त्रास दिला; मात्र गुरुदेवा, तुम्ही ईश्वरी अवतार असल्यामुळे या सगळ्याला समर्थपणे तोंड देऊ शकला.
देवा, तुम्ही इतके त्रास भोगल्यावर तुमची महती जगाला पटली. ‘आमचे गुरुदेव कोण आहेत !’, हे जगाच्या लक्षात आले. यातून लक्षात येते की, ‘प्रत्यक्ष देवालाही वाईट शक्तींशी झुंज द्यावी लागते.’ आपल्या सर्वांसमोर श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची उदाहरणे आहेत. तुमचे कार्य पाहून महर्षींनी जगाला दाखवून दिले की, ‘आमचे गुरु ईश्वरी अवतार आहेत !’
५. गुरुचरणी प्रार्थना
‘देवा, ‘आम्हा साधकांना आपल्याप्रमाणे तळमळीने सेवा आणि साधना करता येऊ दे. तुम्ही शिकवण्यासाठी समर्थ आहात; पण आमचीच झोळी फाटकी आहे. ही फाटकी झोळी शिवून आशीर्वादाचे दान देणारे तुम्हीच आहात ! देवा, ‘तुम्ही आम्हा साधकांसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहात’, याची आम्हाला जाणीव असू दे. आमच्या मनात कोणतेही विकल्प न येता आम्हाला सतत साधनारत रहाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त मनोभावे प्रार्थना !’
– (पू.) सौ. शैलजा परांजपे, फोंडा, गोवा. (१५.७.२०२४)