कोईम्बतूर (तमिळनाडू) – सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या तमिळनाडूतील थोंडामुथूर येथील आश्रमात साहाय्यक उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्याच्या नेतृत्वाखाली १५० पोलिसांच्या पथकाने झडती घेतली. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. न्यायालयाने पोलिसांकडून फाऊंडेशनच्या विरोधात नोंदवलेल्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांचा अहवाल मागवला आहे. त्यासाठी ही झडती घेण्यात आली. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले की, या कारवाईचा उद्देश आश्रमात रहाणार्या लोकांची तपशीलवार पडताळणी करणे आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व खोल्यांची झडती घेणे, हा आहे.
२ मुलींना बंदी बनवून ठेवण्यात आल्याच्या तक्रारीनंतर झहती !
निवृत्त प्राध्यापक डॉ. एस्. कामराज यांनी प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला होता. कामराज यांनी त्यांंच्या २ मुलींना फाऊंडेशनमध्ये बंदी बनवून ठेवण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यांचा आरोप आहे की, ‘ईशा फाऊंडेशन’ लोकांचा बुद्धीभेद करत आहे, त्यांना भिक्षू बनवत आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करू देत नाही.