Varanasi Sai Baba Idol Controversy : ‘सनातन रक्षक दला’ने वाराणसीतील १० मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

वाराणसी (उत्तरप्रदेश) – सनातन रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी येथील १० मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या. कार्यकर्त्यांनी मूर्तींवर कापड टाकले आणि त्यानंतर त्या मंदिरांमधून हटवल्या. यामध्ये प्रसिद्ध गणेश मंदिर आणि पुरुषोत्तम मंदिर यांचाही समावेश आहे. यामुळे काशीमध्ये वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाने ‘हे सनातन रक्षक दलाकडून जाणीवपूर्वक केले जात आहे’, असा आरोप केला. यासह इतर काही नेत्यांनी या सूत्रावरून भाजपावर टीका केली आहे.

हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे मंदिरात माणसाची मूर्ती ठेवून पूजा करू नये ! – सनातन रक्षक दल

सनातन रक्षक दलाचे म्हणणे आहे की, हिंदूंच्या मंदिरात शास्त्रांमध्ये सांगितली आहे, तशीच पूजा व्हायला हवी. शास्त्र असे सांगते की, मंदिरांमध्ये कुठल्याही माणसाची मूर्ती ठेवून पूजा करू नये. आम्ही या मूर्ती हटवत आहोत; पण आम्ही साईबाबांचे विरोधक नाही. आम्ही या मूर्ती दुसर्‍या ठिकाणी नेत आहोत. बागेश्‍वर धाम सरकार पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनीही काही दिवसांपूर्वी ‘साईबाबांची पूजा करू नका’ असे म्हटले होते. साईबाबांना ‘संत’, ‘महात्मा’ म्हणून पूजण्यात काहीही चुकीचे नाही; मात्र त्यांना देव म्हणून पूजणे चुकीचे आहे, अशी आमची भूमिका आहे. मंदिर समितीची संमती घेतल्यानंतरच आम्ही या मूर्ती हटवल्या आहेत.