बेमेतरा (छत्तीसगड) येथील कौटुंबिक न्यायालयाच्या महिला न्यायाधिशांचा स्तुत्य प्रयत्न
बेमेतरा (छत्तीसगड) – येथे आयोजित लोक अदालतीमध्ये घटस्फोट घेण्यासाठी आलेल्या दांपत्यांचे बेमेतरातील कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नीलिमा सिंह बघेल यांनी केलेल्या सकारात्मक समुपदेशनामुळे दांपत्यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला. समुपदेशन करण्यासाठी न्यायाधीश नीलिमा सिंह बघेल यांनी विवाहाच्या वेळी सप्तपदीमधील वचनांचा आधार घेतल्याने हे शक्य झाले.
सर्वोच्च न्यायालयाने पती-पत्नीमधील घटस्फोटासाठी ६ महिन्यांच्या कालावधी ठेवला आहे. हा कालावधी दांपत्यास विचार करण्यासाठी किंवा आपसांतील मतभेद दूर करण्यासाठी दिला जातो. न्यायाधीश नीलिमा सिंह यांनी न्यायालयाच्या भिंतींवर सप्तपदींच्या वचनांची एक चौकट लावली आहे. त्या दांपत्यांना या ७ वचनांचे पालन करण्यास सांगतात. त्यामुळे पती-पत्नीला परस्परांविषयी, मुलांविषयी आणि कुटुंबाविषयीच्या दायित्वाचे स्मरण होईल.
याविषयी न्यायाधीश नीलिमा सिंह म्हणाल्या की, सप्तपदी संस्कृतमध्ये असते. विवाहाप्रसंगीच्या या वचनांची आठवण बहुतांश लोकांना नसते; म्हणूनच मी या सप्तपदींचा हिंदीत अनुवाद करून त्याची ‘फ्रेम’ भेट देते, जेणेकरून त्यांना त्यांच्या दायित्वाची जाणीव सदैव राहील.
संपादकीय भूमिकाहिंदु संस्कृतीनुसार दांपत्यांच्या जीवनात घटस्फोटाची कोणतीही तरतूद नाही. घटस्फोट हा पाश्चात्यांच्या विकृतीतील एक प्रकार आहे. दांपत्यांनी सप्तपदींतील वचनांचे प्रामाणिकपणे पालन केले, तर घटस्फोटाचा विचार कधीच मनात येणार नाही ! |