सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सांप्रतच्या कलियुगातही एकत्र कुटुंबपद्धतीचा लाभ अनुभवणारे अस्नोडा (गोवा) येथील चोडणकर कुटुंबीय !

१. पूर्वीची कौटुंबिक स्थिती

१ अ. मोठे कुटुंब

श्री. गोविंद चोडणकर

‘अस्नोडा (गोवा) येथील भंडारवाडा या गावात असलेल्या एकूण ४० ते ४५ घरांपैकी आमचे एक मोठे कुटुंब होते. मी अगदी लहान असतांना आमचे वडील वारले. आम्ही एकूण ८ भावंडे (५ भाऊ आणि ३ बहिणी) आहोत. बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. वडील असतांना केवळ एका मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. आम्हा भावांमध्ये मी सर्वांत मोठा असून मला ४ लहान भाऊ आहेत.

१ आ. वडील गेल्यानंतर आईने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करणे

वडील गेल्यानंतर आमच्या उदरनिर्वाहासाठी अगदी ४ मासांतच आमची आई ((कै.) किशोरी चोडणकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८६ वर्षे) झाडू, नारळ आणि सुंभ (नारळाच्या काथ्यापासून बनवलेल्या दोर्‍या) घेऊन विकण्यासाठी घराबाहेर पडली. डिचोली, साखळी, अस्नोडा आणि दोडामार्ग येथील बाजारात जाऊन ती ते विकायला बसत असे. असे अविरत प्रयत्न आणि त्रास सहन करून तिने आमचा सांभाळ केला.

१ इ. आईच्या माध्यमातून चांगली शक्ती मार्गदर्शन करत असल्यामुळे गावकरी आणि नातेवाईक यांनी त्यांच्या अडचणींवर उपाय विचारण्यासाठी घरी येणे

पूर्वीपासूनच आमच्या घरी पुष्कळ धार्मिक कृती होत होत्या. आईच्या माध्यमातून चांगली शक्ती मार्गदर्शन करत असे. आमचे नातेवाईक त्यांच्या अडचणी किंवा संकटे तिच्यासमोर मांडत. तेव्हा आई त्यांना काही आध्यात्मिक उपाययोजना सांगत असे. तिने सांगितलेल्या उपायांनी अनेकांच्या अडचणी सुटत असत. त्यामुळे हळूहळू गावातील बरेच लोक तोडगे घेण्यासाठी (उपाय विचारण्यासाठी) आमच्या घरी येत. यामुळे आमचे घर, म्हणजे सगळे नातेवाईक आणि गावकरी यांचे एक प्रकारे श्रद्धास्थानच बनले होते.

२. एकत्र कुटुंबव्यवस्था टिकून रहाण्याची कारणे

२ अ. साधनेमुळे लाभ होणे

वर्ष १९९८ मध्ये मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शानुसार साधना करू लागलो. आमच्या गावातील देवळात सत्संग चालायचा. मला अध्यात्माची गोडी असल्यामुळे मी हळूहळू सत्संग घ्यायचा प्रयत्न केला आणि पुढे मग आमच्या घरीच सत्संग होऊ लागला. त्यामुळे कुटुंबामध्ये एकोपा वाढू लागला.

२ आ. आईचा प्रेमभाव

आईने आम्हा सर्वांचे शिक्षण पूर्ण केले. सगळ्यांची लग्ने लावून दिली. आम्ही सर्व भाऊ लग्न होऊनसुद्धा एकत्र रहात होतो. आम्हा सर्वांना मुले झाल्यावरही कुटुंब एकत्रच होते. आईला घरातील प्रत्येकाची काळजी असायची. तिच्या या प्रेमभावामुळेच आम्ही सगळे एकत्र टिकून होतो.

२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कुटुंबियांना संकटांमधून वाचवणे

प.पू. गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) आमच्या कुटुंबावर अपार कृपा होती. मी हे अनेकदा अनुभवायचो. आमच्या जीवनात बरीच मोठी संकटे आली; पण गुरुदेव आम्हाला प्रत्येक संकटातून वाचवत होते. त्यांच्याच कृपेमुळे मी एका प्राणघातक अपघातातून वाचलो आहे.

२ ई. मोठ्या भावाने कुटुंबाचे दायित्व जाणीवपूर्वक स्वीकारणे

‘मी ५ भावांमध्ये सर्वांत मोठा असल्यामुळे अन्य भावंडांना सांभाळण्याचे दायित्व आईइतकेच माझ्यावरही आहे’, हे मी इयत्ता नववीत असतांना जाणले होते. त्यामुळे मी शाळा आणि महाविद्यालय येथे शिकत असतांना संध्याकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घ्यायचो. नंतर मी रात्रभर बसून माझा अभ्यास करायचो, तसेच अन्य भावंडांच्या शिक्षणाकडेही लक्ष द्यायचो. मला प्रत्येक मासात मिळणारे वेतन मी लग्नानंतरही आईच्या हातातच द्यायचो.

२ उ. मोठ्या भावाचे आदर्शवत् वर्तन

माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मला चांगली नोकरी मिळाली; कुटुंबियांना सोडून इतरत्र कुठे रहाण्याचा मी कधीच विचार केला नाही. त्यामुळे माझा आदर्श घेऊन अन्य भाऊसुद्धा एकत्र कुटुंबातच राहिले.

२ ऊ. मुले आणि सुना यांच्या प्रयत्नांमुळे एकोपा टिकून रहाणे

सर्वांसाठी घरात एकाच चुलीवर एकत्रच स्वयंपाक व्हायचा. सगळ्या सुना एकमेकींशी बहिणींसारख्या वागायच्या. आम्ही भावंडे नोकरी-धंदा करून कमावून आणत होतो आणि आईच्या मार्गदर्शनानुसार सुना घरातील सगळे व्यवहार बघत होत्या. आम्ही सगळेजण घरखर्च विभागून घेत होतो. आम्ही सगळेजण गुण्यागोविंदाने एकत्र रहात असल्याने गावातील लोकांना आश्चर्य वाटायचे.

२ ए. मुले कमवू लागली, तरी आईने व्यवसाय चालूच ठेवणे

आम्ही मुले कमवायला लागलो; म्हणून आई घरी बसली नाही. तिने तिचा व्यवसाय चालूच ठेवला. मी आईला अधूनमधून म्हणायचो, ‘‘आई, आता पुरे झाले. आता आम्ही नोकरीधंदा करत आहोत. आता तू त्रास घेऊ नकोस.’’ तेव्हा ती म्हणायची, ‘‘माझ्या शरिरात त्राण असेपर्यंत मी कष्ट करणार. मी घरी थांबले, तर अंथरूणाला खिळेन.’’

२ ऐ. चूल वेगळी झाली, तरी सर्वांची ओढ मात्र एकत्र कुटुंबपद्धतीकडेच असणे

वर्ष २०१८ नंतर आईच्या इच्छेने आम्हा ५ भावांना एकाच घरात रहाण्यासाठी विभागून जागा देण्यात आली. तेव्हा प्रत्येकाची चूल वेगवेगळी झाली. त्यापूर्वी कुटुंबात आम्ही एकूण २१ जण रहात होतो. जरी चूल वेगळी झाली, तरी सर्वांची ओढ मात्र एकत्र कुटुंबपद्धतीकडेच आहे. घरात कधीही कुणाला काही न्यून पडले, तर आम्ही एकमेकांना साहाय्य करतो. या कलियुगात असे एकत्र कुटुंब आम्ही अनुभवत आहोत. ही गुरुदेवांचीच कृपा आहे.

२ ओ. घरातील सर्वांनी एकत्रित सामूहिक नामजप करणे

आईचे निधन झाल्यावर पहिल्या दिवसापासूनच आम्ही सगळेजण तिन्हीसांजेच्या वेळी सामूहिक नामजपाला एकत्र बसतो. नामजप झाल्यावर आम्ही अर्धा घंटा सत्संग घेतो. घरातील सर्वांवर या सत्संगाचा चांगला परिणाम होऊ लागला आहे. (कुटुंबातील सर्वजण साधना करत असल्यामुळे त्यांच्यात स्वभावदोषांमुळे संघर्ष न होता त्यांना एकत्र रहाण्याचा लाभ होत आहे. – संकलक)

३. भारतीय संस्कृती आणि परंपरा नष्ट करण्याच्या हेतूनेच ब्रिटिशांनी भारतियांची एकत्र कुटुंबपद्धती नष्ट केल्याचे लक्षात येणे

स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगावी मोठमोठी कुटुंबे एकत्र सुखाने नांदत होती. ब्रिटिशांना नेमके हेच नको होते. त्यामुळेच त्यांनी एकत्र कुटुंबव्यवस्था नष्ट करण्यावर भर दिला. एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये कुटुंबियांमध्ये प्रेमभाव, समजूतदारपणा, एकमेकांचा आदर राखणे, निर्णयक्षमता, उद्योगशीलता, उत्तम नियोजन, आपली संस्कृती आणि परंपरा यांचे पालन करणे, अशांसारखे अनेक गुण आपोआपच येतात. एकत्र कुटंबपद्धतीचे हे लाभ लक्षात आल्याने आणि स्वतः ते अनुभवत असल्यामुळे ‘ब्रिटिशांनी भारतियांची एकत्र कुटुंबपद्धती का नष्ट केली ?’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे आता ‘आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत’, याची मला जाणीव झाली.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यामुळेच इतकी वर्षे मी माझ्या भावंडांसमवेत एकत्र जीवन जगू शकलो. ही सर्व गुरुदेवांचीच कृपा आहे. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– गुरुसेवक,

श्री. गोविंद चोडणकर (वय ५१ वर्षे), अस्नोडा, गोवा. (जुलै २०२३)