Israel : हिजबुल्लाच्या आतंकवाद्यांना घरात दारुगोळा ठेवण्याची अनुमती दिली, तर घर उद्ध्वस्त करू !

  • इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमध्ये विमानातून पत्रके टाकून स्थानिक जनतेला दिली चेतावणी !

  • दक्षिण लेबनॉन सोडून जाण्याचेही केले आवाहन

  • लाखो लोक करत आहेत पलायन !

बेरूत (लेबनॉन) – इस्रायल सातत्याने लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेवर आक्रमणे करत आहे. आता इस्रायल भूमीद्वारे लेबनॉनमध्ये घुसून हिजबुल्लाला संपवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात लेबनॉनमध्ये विमानातून चेतावणी देणारी पत्रके टाकण्यात आली आहेत. यात म्हटले आहे की, ‘लेबनॉनच्या जनतेने हिजबुल्लाच्या आतंकवाद्यांना स्वतःच्या घरात क्षेपणास्त्रे आणि दारुगोळा ठेवायची अनुमती दिली, तर त्यांची घरे उद्ध्वस्त होणार हे निश्‍चित !’ तसेच ‘लोकांनी लवकरात लवकर दक्षिण लेबनॉन सोडावे’, असे आवाहनही केले आहे. यानंतर येथून लाखो लोक पलायन करत असल्याचे दिसून येत आहे.

चेतावणी देणारी पत्रके

हिजबुल्लाचे केवळ ३ प्रमुख शिल्लक !

इस्रायलने गेल्या ४ दिवसांत केलेल्या आक्रमणांत हिजबुल्लाच्या बहुतेक प्रमुखांना ठार केले आहे. आता केवळ ३ प्रमुख शेष राहिले आहेत. यात संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह, हिजबुल्लाच्या दक्षिण मोर्चाचा कमांडर अली कराकी आणि बद्र युनिटचा प्रमुख अबु अली हे होत. अन्य १८ प्रमुख पदाधिकार्‍यांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने या कारवाईला ‘ऑपरेशन नॉर्दर्न रो’ नाव दिले आहे. या आक्रमणात हिजबुल्लाची अर्धी सैन्य शक्ती नष्ट झाली आहे. इस्रायलच्या एका दिवसाच्या कारवाईचा खर्च १ सहस्र ५०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

हिजबुल्लाचे ७० सहस्र रॉकेट आणि क्षेपणास्त्रे नष्ट !

इस्रायलच्या आक्रमणापूर्वी हिजबुल्लाकडे १ लाख ४० सहस्र रॉकेट आणि क्षेपणास्त्रे यांचा साठा होता; पण इस्रायलच्या कारवाईत हिजबुल्लाचा निम्मा रॉकेट अन् क्षेपणास्त्र साठा नष्ट झाला आहे. याचा अर्थ ७० सहस्र रॉकेट आणि क्षेपणास्त्रे जळून नष्ट झाली आहेत. इस्रायली सैन्याच्या दाव्यानुसार हिजबुल्लाची ५० टक्के शस्त्रे, ५० टक्के रॉकेट लँच पॅड आणि ६० टक्के तळ नष्ट झाली आहेत.

भारतियांनी त्वरित लेबनॉन सोडावा ! – भारत सरकारची सूचना

भारत सरकारने लेबनॉनविषयी एक नवीन सूचना प्रसारित केली आहे. बेरूतमधील भारतीय दूतावासाने येथे रहाणार्‍या भारतीय नागरिकांना त्वरित देश सोडण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर लोकांना अत्यंत सावध रहाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. २ महिन्यांपूर्वीच दूतावासाने लोकांना लेबनॉनमध्ये जाण्यास मनाई केली होती.

संपादकीय भूमिका

भारत इस्रायलकडून जिहादी आतंकवाद नष्ट करण्यास कधी शिकणार आणि कृती करणार ?