पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतातील प्राचीन शिक्षणपद्धत, आदर असल्याने अत्याचार किंवा दुराचार यांना स्थान नसणे, भारतियांंविषयी विदेशींनी काढलेले गौरवोद़्गार, धर्म म्हणजे काय ? अन् पूर्वी स्त्री-पुरुषांचे एकत्र आणि एकरूप शिक्षण नसण्यामागील कारण’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग ५६)
प्रकरण १०
भाग ५५ वाचण्यासाठी क्लिक करा –
https://sanatanprabhat.org marathi/837209.html
४. ‘लेखनाविना ग्रंथ’ ही कल्पना करणे, म्हणजे शुद्ध वेडेपणा असणे
काही मंडळी ‘पूर्वी भारतात शिक्षणच नव्हते’, असे समजतात, ते खरे नाही. विविध शास्त्रांत भारत हा अत्यंत प्रगत देश होता. प्राचीन गणितशास्त्र, ग्रहगतीशास्त्र असामान्य प्रगत होते. आपली लेखनकलासुद्धा किमान १० सहस्र वर्षांइतकी प्राचीन आहे.
काही मंडळींच्या मते पूर्वी लेखनकलाच नव्हती. वेदांसारखे महाप्रचंड ग्रंथ केवळ स्मरणात साठवले गेले होते आणि श्रवणांनी ते ऐकून पाठ केले जात असत. उपरोक्त स्मरण आणि श्रवण यांचा भाग खरा आहे; पण म्हणून ‘ते कधी लिहिलेच जात नव्हते’, असे म्हणणे चुकीचे आहे. ‘लेखनाविना ग्रंथ’ ही कल्पना करणे, म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. या वेदवाङ्मयातच लेखनाचे उल्लेख कितीतरी वेळा आले आहेत. भाषेचे तोंडी आवाज चिन्हांनी टिपणे, म्हणजे लिपी. ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त ७१, ऋचा ४ मध्ये स्पष्ट म्हटले आहे, ‘त्या मंत्रांच्या द्रष्ट्यांनी वाचिक उद़्गार चिन्हाकृतीत उमटवण्याची कला साध्य केली होती.’ श्री. श्री.द. कुलकर्णी ‘भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा प्रारंभकाल’, या पुस्तकात अनेक आधार दिलेले आहेत.
५. लेखनाविषयीचे संदर्भ
अ. व्यालिखि देवानां चिह्रम् ।
अर्थ : या ३ ओळी देवी चिन्हे आहेत.
आ. यदुक्तं लिखितं अर्पितेन ।
अर्थ : जे बोलले, ते बरोबर लिहिले आहे.
इ. न करिष्यति यदि ब्रह्मा लिखितं चक्षुरुत्तमम् ।
तत्र इयमस्य लोकस्य न भविष्यत् शुभां गतिः ॥
अर्थ : ब्रह्मदेवाने लेखनकलेद्वारे उत्तम नेत्राचा विकास केला नसता, तर जगाला ही शुभ गती प्राप्त झाली नसती.
ई. षाण्मासिके तु सम्प्राप्ते भ्रान्तिः सञ्जायते यतः ।
धात्राक्षराणि सृष्टानि पत्रारूढान्यतः पुरा ॥
अर्थ : एखाद्या घटनेला ६ मास झाल्यानंतर भ्रम उत्पन्न होतो; म्हणून ब्रह्मदेवाने पत्रावर (वा कागदावर) लिहिण्याची अथवा कोरण्याची अक्षरे निर्माण केली. खरेतर विविध शास्त्रांवर सहस्रो ग्रंथ लिहिण्यात आले आहेत.
६. भारतात विकसित झालेली असंख्य शास्त्रे !
काव्यशास्त्र, साहित्यशास्त्र, व्याकरणशास्त्र, सांख्यशास्त्र, ज्योतिषशास्त्र, बीजगणितशास्त्र, भूगर्भशास्त्र, शिल्पशास्त्र, वास्तुशास्त्र, सौंदर्यशास्त्र, इतिहासशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र, योगशास्त्र, वैद्यकशास्त्र, शल्यविद्याशास्त्र, कामशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीतीशास्त्र, प्रसूतीशास्त्र, तंत्रशास्त्र, मंत्रशास्त्र, वेदांतशास्त्र, वंशशास्त्र, सुप्रजाजननशास्त्र, अणुशास्त्र, औषधीनिर्माणशास्त्र, भौतिकी शास्त्र, तर्कशास्त्र, न्यायशास्त्र, विमान रचनाशास्त्र इत्यादी असंख्य शास्त्रे भारतात विकसित झाली होती. मॅक्समुल्लरने सहस्रो ग्रंथांची गणना करून म्हटले आहे की, ज्यांची हस्तलिखिते सांप्रत उपलब्ध आहेत, अशा संस्कृत भाषेत १० सहस्र निरनिराळे ग्रंथ आहेत. विमानविद्येवरही एक प्राचीन ग्रंथ आहे. कलाकौशल्य, पाककला, भव्य इमारतींची सहस्रो वर्षांपूर्वी बांधणी करणारी वास्तुकला ही केवढी ज्ञानभांडारे आहेत !
अशा असंख्य शास्त्रांत पारंगत होतांना वर्णजाती आड येत नव्हती. बुद्धीच्या विकासाला आकाश हीच मर्यादा होती. विश्वनियंता जगदात्मा परमेश्वर काय आणि कसा आहे, हे सांगणारे वेदांत तत्त्वज्ञान ‘मीच परमेश्वर आहे’ या सिद्धांतापर्यंत जाऊन पोचते.
(मानवी जीवनातील ज्ञानाच्या सर्वोच्च स्थानावर भारतीय विद्या आणि शास्त्रे भरार्या घेत होती, तेव्हा जगातील अनेक भागांतील लोक अंगांना रंग फासून गुहांमधून आणि बिळांमधून रहात होते.)
(क्रमशः)
– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सु.ग. शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
भाग ५७. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/838225.html