फोंडा (गोवा) येथील श्री. विजय लोटलीकर यांच्या घरी असलेल्या गुरु आणि देवता यांच्या चित्रांमध्ये झालेले पालट

श्री. विजय लोटलीकर

१. साधकाच्या घरातील गुरु आणि देवता यांच्या चित्रांमध्ये झालेले पालट

‘आमच्या घरी एका पटलावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणदर्शन – खंड ५’ हा ग्रंथ आणि पू. वागळे आजोबा (सनातन संस्थेचे ६५ वे संत पू. (कै.) जनार्दन कृष्णाजी वागळे, देवीहसोळ [तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी] यांचा देहत्याग १९.३.२०२२) यांनी दिलेली गुरुदेवांची चित्रे आहेत. त्यांपैकी गुरुदेवांची श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या वेशातील दोन लहान चित्रे आणि श्रीकृष्णाचे चित्र आम्ही भिंतीवर लावले आहे. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणदर्शन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील गुरुदेवांच्या छायाचित्रातील त्यांचा पांढरा सदरा पूर्णपणे पिवळा झाला आहे. भिंतीवर असलेले श्रीकृष्णाचे चित्र पांढरे झाले आहे. पू. वागळे आजोबांनी दिलेले गुरुदेवांचे चित्र पिवळे झाले आहे.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणदर्शन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील गुरुदेवांच्या छायाचित्रातील त्यांचा पांढरा सदरा पूर्णपणे पिवळा झाला आहे.

श्रीकृष्णाचे पांढरे झालेले चित्र

२. गुरु आणि देवता यांच्या चित्रांमध्ये झालेल्या पालटांमुळे आलेल्या अनुभूती

२ अ. नामजप आनंदात होणे आणि घरातील चैतन्य वाढणे : माझी पत्नी सौ. संगीता लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६४ वर्षे) प्रतिदिन गुरु आणि देवता यांच्या चित्रांची पूजा करते. मी आणि सौ. संगीता तिथे बसून आमचा वैयक्तिक अन् समष्टीला होणारे त्रास न्यून होण्यासाठी करण्याचा जप करतो. जपाला बसल्यावर आमचा नामजप आनंदात होतो. नामजपाच्या वेळी आमच्या डोळ्यांसमोर ईश्वराचे (गुरुदेवांचे) रूप दिसून आनंद मिळतो. आमच्या घरातील चैतन्यामध्ये वाढ झाली आहे.

२ आ. घरातील सर्वांची सकारात्मकता वाढणे : ‘आम्ही सर्व जण आश्रमामध्येच रहात आहोत’, असे समजून घरात रहातो. आमच्यामध्ये सकारात्मकता वाढली आहे. कोणत्याही प्रसंगात ‘ईश्वरच सर्व घडवत आहे’, असे मला वाटते, त्यामुळे माझी नकारात्मकता अल्प झाली आहे. आम्ही घरात देवाजवळ २४ घंटे तिळाच्या तेलाचा दिवा लावतो. आम्ही घरात एकमेकांना समजून घेऊन रहातो.

या सर्व अनुभूती गुरुदेवांनी दिल्या, यासाठी त्यांच्या चरणी शरणागत होऊन नमस्कार करतो.’

– श्री. विजय लोटलीकर (वय ७१ वर्षे, वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (९.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक