‘सौ. शकुंतला बद्दी यांनी साधनेला केलेला आरंभ, कुटुंबातील सर्वांचे आजारपण आणि यजमानांचा साधनेला असलेला विरोध इत्यादी भाग आपण २४ सप्टेंबर या दिवशीच्या लेखात पाहिला. या लेखात त्यांच्या साधनेमुळे काव्याच्या माध्यमातून जागृत झालेली त्यांची प्रतिभा, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेच्या अंतर्गत चुकांचे लक्षात आलेले गांभीर्य, त्यांच्यात जाणवलेले पालट आणि त्यांना आलेल्या अनुभूती जाणून घेऊया. (भाग २)
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/836950.html
५. प्रतिभा जागृत होणे
५ अ. अनेक विषयांवर काव्यरचना करणे : वर्ष २००७ मध्ये गुरुपौर्णिमेच्या आधी ८ दिवस मला अकस्मात् एक कविता सुचली. ती पुढे दिली आहे.
‘कशी येऊ मी सांगा देवा, घेऊनी नामाचा ठेवा ।
गुरुविण नाही, अन्य कुणी आधार ।।
त्यानंतर परात्पर गुरुदेवांनी प्रसंगानुरूप देव, देश, धर्म, नातेवाईक आणि गुरु अशा अनेक विषयांवर काव्यरचना करून घेतल्या. यांतूनच माझ्या साधनेचे अनेक पैलू उलगडले.
५ आ. काव्य सुरात गात असतांना भावविभोर होऊन नाचू लागणे : एकदा मी एक काव्य लिहिले. ते काव्य मी सुरात गात असतांना भावविभोर होऊन नाचू लागले. माझे यजमान तेथे आले आणि मुलांना म्हणाले, ‘‘अरे, ही तर वेड्यासारखी करू लागली आहे.’’ तेव्हा मीसुद्धा आनंदाने म्हणाले, ‘‘हो, मी भगवंताची वेडीच आहे. असे वेड लागल्याने माझा उद्धार होणार आहे.’’
५ इ. घोर कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आनंदात ठेवल्याने त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे : मला काव्यातून भगवंताची कृपा अनुभवता आली. माझ्या मनात विचार आला, ‘मी काव्यरचना करून गात असतांना मला एवढी भावावस्था अनुभवता येते, तर श्रीकृष्णाच्या समवेत गोपगोपींची अवस्था कशी झाली असेल? सनातनच्या आश्रमात कित्येक साधक साधना करत आहेत, ते किती आनंदात असतील !’, याची मला जाणीव झाली. या घोर कलियुगात परात्पर गुरुदेवांनी सतत आनंदात ठेवल्याने मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘हे माझे काव्यधन आपल्या चरणी समर्पित करून घ्यावे’, अशी परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते.
६. स्वतःवरील आवरणामुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे गांभीर्य न वाटणे अन् प्रयत्नात वाढ झाल्यावर चुकांचे गांभीर्य लक्षात येणे
अनेक वर्षांपासून परात्पर गुरु डॉक्टर सर्वांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया (टीप १) राबवायला सांगत आहेत. माझ्याकडून ती गांभीर्याने आणि सातत्याने होत नव्हती; कारण मला माझ्याकडून होणार्या चुकांविषयी खंत वाटत नव्हती. त्याविषयी परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मी अधिक चिंतन केले. त्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘माझ्यावर आलेल्या त्रासदायक शक्तीच्या आवरणामुळे मला कशाचेच गांभीर्य वाटत नव्हते.’ माझ्या प्रयत्नात वाढ झाल्यावर चुकांचे गांभीर्य लक्षात आले.
(टीप १: स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया : स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका वहीत लिहून त्या पुढे ‘त्या चुका कोणत्या स्वभावदोषांमुळे झाल्या?, ते लिहिणे आणि ‘तशा चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी त्यापुढे योग्य दृष्टीकोनाच्या स्वयंसूचना लिहून त्या दिवसातून १०-१२ वेळा मनाला देणे)
७. साधनेत एकमेकांना साहाय्य करणे
आम्ही सर्व साधक सेवा करतांना आमच्याकडून झालेल्या चुका एकमेकांना सांगतो. सहसाधकांना स्वयंसूचना (टीप २) बनवणे जमत नसेल, तर त्या आम्ही एकमेकांना बनवून देण्यासाठी साहाय्य करतो. मला प्रत्येक साधकाच्या चुकांमधून शिकायला मिळते आणि साधनेत पुढे जाण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळते.
टीप २ – स्वयंसूचना : स्वभावदोष निर्मूलनाच्या अंतर्गत मनावर योग्य विचार किंवा योग्य कृती करण्याचा संस्कार होण्यासाठी स्वतःच्या मनाला पुनःपुन्हा सूचना देणे, म्हणजे स्वयंसूचना.
८. स्वतःमध्ये जाणवलेले पालट
अ. मला माझ्या असंख्य चुका लक्षात येऊ लागल्या आणि त्या मला स्वीकारता येऊ लागल्या.
आ. मला चुकांची पुष्कळ खंत वाटू लागली.
इ. माझ्यातील ‘राग येणे’ हा स्वभावदोष आता उणावला आहे.
ई. माझ्यामध्ये ‘इतरांचा विचार करणे, हळू आवाजात बोलणे आणि इतरांना साहाय्य करणे’, इत्यादी गुणांची वाढ झाली आहे.
९. अनुभूती
९ अ. नामजपादी उपाय केल्यावर स्वतःवरील आवरण निघून जाणे आणि देह पिवळ्या प्रकाशाने चमकू लागणे : मी नामजपादी उपाय करू लागले. एकदा मला नामजप करतांना एक दृश्य दिसले. त्यात माझ्यावर काळा बुरखा घातल्याप्रमाणे प्रचंड आवरण आले होते. मी आवरण काढायला आरंभ करताच ते आवरण निघून गेले आणि माझा देह पिवळ्या प्रकाशाने चमकू लागला. तेव्हापासून मी स्वतःवरील आवरण नियमित काढते.’
‘गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), हे सर्व लिखाण आपणच लिहून घेतले’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. शकुंतला बद्दी, खारघर, नवी मुंबई (जुलै २०२४) (समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |